मालदीवचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम मोहम्मद सोलिह यांनी भारताचं तोंड भरुन कौतुक केलं आहे. भारतानं सातत्यानं मालदीवला केलेल्या मदतीसाठी त्यांनी आभारही मानले आहेत. गेल्या २ वर्षात भारताने आम्हाला अनेक प्रसंगी उदारपणे मदत केल्याचं त्यांनी सांगितलं. भारतानं कोरोना प्रतिबंधात्मक लसी आम्हाला दिल्या. तसंच मालदीवची अर्थव्यवस्था तारण्यासाठी मदत म्हणून २५० मिलियन डॉलर्सचे आर्थिक बॉन्ड खरेदी केली. याशिवाय उत्तम आरोग्य सेवा पुरवण्यासाठी अनेक आवश्यक उपकरणंही दिली असल्याचं त्यांनी नमूद केलं. सोलिह यांनी राष्ट्राला संबोधित करताना भारताचं कौतुक करत आभार मानले.
"पर्यटकांचे आगमन सुनिश्चित करण्यासाठी मालदीव आणि भारत यांच्यात ट्रॅव्हल कॉरिडॉर तयार करण्यात आला आहे. भारताने मालदीववासीयांसाठी तातडीच्या आरोग्य सेवेची गरज भागवली आणि त्यांना देशात प्रवास करण्याची परवानगी दिली. हा विशेषाधिकार मालदीवशिवाय इतर कोणत्याही देशाला देण्यात आलेला नाही," असं सोलिह म्हणाले. मालदीवमध्ये १२ मार्च २०२० रोजी पब्लिक हेल्थ इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली होती. परंतु आता मालदीवला कोरोनाच्या निर्बंधातून सूट देण्यात आली आहे.
रशिया युक्रेन युद्धाचाही उल्लेखसालिह यांनी यावेळी रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचाही उल्लेख केला. १४१ देशांमध्ये सहभागी होऊन मालदीवनं युक्रेनवर रशियाच्या हल्लाची निंदा करत तात्काळ युद्धविराम आणि रशियाच्या लष्कराला माघारी बोलावण्याची मागणी केली होती. युक्रेनच्या नागरिकांसाठी हा वाईट क्षण आहे. मी या अत्यांचारांविरोधात सहानुभूती व्यक्त करतो. युक्रेनला यातून बाहेर पडण्यासाठी वर्षांचा कालावधी लागू शकतो, असंही ते म्हणाले.