ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझिनेकाच्या कोरोनाविरोधी लस म्हणजेच भारतात सीरम इन्स्टिट्यूट बनवित असलेली कोव्हिशिल्ड बाबत चिंताजनक अहवाल समोर आला आहे. हा अहवाल लँसेट जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. ओमायक्रॉनच्या संकटात हा अहवाल आल्याने खळबळ उडाली आहे.
लँसेटमध्ये छापून आलेल्या या अहवालात ब्राझील आणि स्कॉटलंड येथून माहिती गोळा करण्यात आली आहे. या संशोधनात ज्या लोकांनी कोव्हिशिल्डचे दोन डोस घेतले आहेत त्यांना कोरोनाच्या गंभीर संक्रमणापासून वाचण्यासाठी बुस्टर डोसची गरज असल्याचे म्हटले आहे. अॅस्ट्राझिनेकाच्या लशीचे दोन डोस घेतलेले स्कॉटलंडचे 20 लाख आणि ब्राझीलच्या 4.2 कोटी लोकांचा डेटा गोळा करून त्यावर संशोधन करण्यात आले. कोव्हिशिल्ड घेतल्यानंतर लशीचा परिणाम तीन महिन्यांतच कमी होऊ लागतो. या काळात हॉस्पिटलमध्ये भरती होणे आणि मृत्यू होण्याची शक्यता दुसरा डोस घेतल्याच्या दोन आठवड्यांच्या तुलनेत दुप्पट होते. दुसरा डोस घेतल्याच्या चार महिन्यांनी ही शक्यता तिप्पट होते, असे संशोधकांनी म्हटले आहे.
ब्रिटनमधील युनिव्हर्सिटी ऑफ एडिनबर्गचे प्रोफेसर अजीज शेख यांनी म्हटले की, कोरोना महामारीच्या विरोधात लस हे एकमेव हत्यार आहे. मात्र, त्याचा प्रभावीपणा कमी होणे हा चिंतेचा विषय आहे. ज्या लोकांना कोरोनाची लस मिळाली नाही ते आणि लस घेतलेले हळू हळू एकाच पातळीवर येण्याची भीती आहे. या संशोधनाने कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिअंटबाबतच्या शक्यतांना वाढविले आहे.
याचबरोबर हे संशोधन खूप महत्वाचे असल्याचे म्हणताना शेख म्हणाले, कोरोना लसीचा प्रभाव कधीपासून कमी होतो, हे समजल्याने सरकारांना बुस्टर डोस कधी पासून सुरु करावा याचा निर्णय घेणे सोपे जाईल. या संशोधनानुसार 12 आठवड्यांनी कोरोना लसीचा प्रभाव सुरु होतो.