Indian Killed in America : अमेरिकेतील टेक्सॉस शहरात पाच वाहनांच्या अपघातात चार भारतीयांचा मृत्यू झाला आहे. चौघे एका कार पुलिंग अॅपद्वारे संपर्कात आले होते. शुक्रवारी बेंटनव्हिले येथे जात असताना एसयूव्ही कारला ट्रकने जोरात धडक दिली. त्यानंतर कारने पेट घेतला. चौघांनाही बाहेर पडता आले नाही आणि होरपळून मृत्यूमुखी पडले. आता पोलिसांकडून डीएनए आणि फिंगरप्रिंटच्या साहाय्याने चौघांच्या मृतदेहाची ओळख पटवली जाणार आहे.
कॉलिन काऊंटी शेरीफ कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ही दुर्दैवी घटना शुक्रवारी (३० ऑगस्ट) दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास घडली. व्हाईट स्ट्रीट जवळ हा अपघात झाला.
अपघातात मृत्यू झालेले भारतीय कोण?
थरकाप उडवणाऱ्या या अपघातात मृत्यू झालेल्या भारतीयांची नावे समोर आली आहे. हैदराबाद येथील आर्यन रघुनाथ ओरमपती, त्याचा मित्र फारूक शेख, लोकश पलाचरला आणि तामिळनाडूची दर्शिनी वासुदेवन अशी मृतांची नावे आहेत.
मृतदेहाची ओळख पटवण्यासाठी डीएनए चाचणी
अपघातानंतर लागलेल्या आगीत चौघांचे मृतदेह पूर्णपणे होरपळे गेले. त्यामुळे कोणता मृतदेह कुणाचा आहे, हे ओळखणे कठीण झाले आहे. स्थानिक अधिकाऱ्याने सांगितले की, "मृतदेहांची ओळख पटवण्यासाठी डीएनए आमि फिंगरप्रिंट केली जाईल. त्यांच्या आईवडिलांच्या डीएनएशी नमुने जुळवले जाईल."
चार भारतीयांच्या गाडीचा अमेरिकेत अपघात कसा झाला?
राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने वाहने संथगतीने पुढे जात होती. त्याचवेळी पाठीमागून येणाऱ्या ट्रकने एसयूव्ही कारला जोराची धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, कारचा चेंदामेंदा झाला आणि आग लागली. त्यानंतर कारमध्ये बसलेले चारही भारतीय आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले आणि होरपळून मृत्यूमुखी पडले.
चौघे कारने कुठे निघाले होते?
बेंटनव्हिलेमध्ये राहणारा आर्यन रघुनाथ ओरमपती डलासमध्ये राहणाऱ्या त्याच्या चुलत भावाला भेटून त्याचा मित्र फारूक शेखसह घरी येत होता. लोकेश पलाचरला त्याच्या पत्नीला भेटण्यासाठी बेंटनव्हिलेला जात होता. तर अर्लिंग्टनमधील टेक्सॉस विद्यापीठातून पदव्युत्तर पदवी घेतलेली दर्शिनी वासुदेवन तिच्या काकाला भेटायला जात होती. चौघांनी कारपुलिंग अॅपच्या माध्यमातून एकत्र प्रवास करण्याचे नियोजन केले होते, पण पोहोण्यापूर्वीच त्यांना मृत्यूने गाठले.