प्रेयसीसाठी पिता हैवान झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तिची एक अट पूर्ण करण्यासाठी त्याने टोकाचं पाऊल उचललं आहे. आपल्या दोन चिमुकल्या मुलांना थेट इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन खाली फेकलं आहे. चीनमध्ये ही संतापजनक घटना घ़डली आहे. पोटच्या मुलांची इमारतीच्या 15 व्या मजल्यावरुन फेकून हत्या केल्याप्रकरणी बाप आणि त्याच्या प्रेयसीला न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. प्रेयसीच्या सांगण्यावरुन बापाने दोन मुलांची हत्या केल्याचा आरोप आहे. प्रियकराच्या पहिल्या पत्नीपासून झालेल्या मुलांची काळजी घेण्याची इच्छा नसल्यामुळे प्रेयसीने तशी अट घातली होती.
‘डेली मेल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरला चीनच्या चोंगकिंग नगरपालिकेतील टॉवर ब्लॉकमधून दोन लहान मुले पडल्याची बातमी समोर आली होती. दोन वर्षांची झांग रुईशू आणि एक वर्षांचा झांग यांगरुई अशी या दोन मुलांची नावं होती. रुईशूचा इमारतीतून पडून जागीच मृत्यू झाला. तर यांगरुईचा मृत्यू थोड्या वेळाने झाला. ही दोन्ही मुलं झांग बो नावाच्या 27 वर्षीय व्यक्तीची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, झांग बो याचा पत्नीशी घटस्फोट झाला होता आणि त्याला त्याची प्रेयसी ये चेंगशेनशी लग्न करायचे होते.
प्रेयसीसाठी पिता झाला हैवान
चेंगशेनने दोन्ही मुलांचा सांभाळ करण्यास नकार दिला. ती त्याला आधीपासूनच त्या मुलांपासून वेगळे राहण्यास सांगत होती. तिने झांग बो यालाही याबाबत सांगितलं होतं. जोपर्यंत तो मुलांपासून वेगळा होत नाही, तोपर्यंत त्याच्याशी लग्न करणार नाही असं तिने म्हटलं होतं. झांग बो याची घटस्फोटित पत्नी चेन मेलिनने सांगितले की, लग्न झाल्यानंतरही झांगचे विवाहबाह्य संबंध सुरू होते. त्यामुळे त्याने घटस्फोट दिला. नुकतेच न्यायालयाने मुलीचा ताबा तिच्या आईकडे देण्याचा आदेश दिला होता. तर मुलगा 6 वर्षांचा होईपर्यंत त्याचा ताबा त्याच्या वडिलांना असेल, असे कोर्टाने सांगितले होते.
जन्मदात्या बापानेच घेतला दोन चिमुकल्यांचा जीव
झांगच्या प्रेयसीला हा प्रकार समजताच तिने त्याला मुलांपासून वेगळे होण्यास सांगितले. एक दिवशी दोन्ही मुलं झांगसोबत असताना प्रेयसीला इतका राग आला, की तिने लाईव्ह व्हिडिओ कॉलवर आपल्या हाताची नस कापली. यामुळे झांग प्रचंड अस्वस्थ झाला आणि त्याने भावनेच्या भरात आपल्या दोन्ही मुलांना इमारतीतून खाली फेकून दिले. पोलिसांनी सांगितले की झांगने सुरुवातीला खोटे सांगितले की त्याची मुले इमारतीतून खाली पडली, तेव्हा तो झोपला होता. नंतर त्याने पोलिसांसमोर रडण्याचे नाटकही केले. पण पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने सर्व काही कबूल केले. 28 डिसेंबर रोजी न्यायालयाने झांग बो आणि त्याची मैत्रीण ये चेंगशेन यांना फाशीची शिक्षा सुनावली. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.