मास्को : रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सार्वमताद्वारे युक्रेनचे क्रिमिया बंदर ताब्यात घेतले आहे. यामुळे रशियाच्या सीमा तर वाढल्याच; पण त्याचबरोबर क्रिमियाच्या समुद्रातील प्रचंड इंधनाचे साठेही मिळाले असून, त्यांची किंमत अब्जावधी डॉलर असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे. क्रि मिया हा आमचाच प्रांत असा दावा करत रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी क्रिमिया जोडून घेतला. त्याबरोबरच रशियाच्या सागरी सीमाही वाढल्या व काळ्या समुद्रातील तेल व वायूचे प्रचंड साठे रशियाच्या मालकीचे झाले. इंधनाबाबतीत स्वयंपूर्ण होण्याचे युक्रेनचे इमले कोसळले आहेत. रशियाने सागरी सीमावर हक्क सांगण्याची कारवाई आंतरराष्टÑीय नियमानुसार केली आहे. सागरी किनारा असणार्या कोणत्याही देशाचा किनारपट्टीपासून २३० मैलापर्यंतच्या जलक्षेत्रावर हक्क असतो. दोन वर्षांपूर्वीपासून या क्षेत्रातील नैसर्गिक वायू व तेलाच्या साठ्याबाबत युक्रेनशी करार करण्याचा रशियाचा प्रयत्न चालला होता; पण यश येत नव्हते. त्यामुळे क्रिमियाबरोबर मिळालेली ही संपत्ती हे रशियाच्या दृष्टीने मोठेच डील आहे, असे रशियाने म्हटले आहे. युके्रनला त्यामुळे कायम रशियाच्या दबावाखाली राहणे भाग पडणार आहे. पण अध्यक्ष पुतीन यांचे प्रवक्ते दिमित्री पेस्कोव यांच्या म्हणण्यानुसार रशियाला ऊर्जा संसाधनांची काही कमी नाही. क्रिमियाचा ताबा व तेथील इंधनाचे भांडार यांचा अर्थाअर्थी काहीही संबंध नाही. तेल व नैसर्गिक वायूसंदर्भात रशियाची स्वत:ची क्षमता पाहता रशियाला क्रिमियातील साठ्याची काही किंमत नाही. एक्सॉन मोबील, रॉयल डच शेल व प्रमुख तेल कंपन्यांनी काळ्या समुद्राचे उत्खनन केले असून, काही तज्ज्ञांच्या मते तेथील साठे उत्तर समुद्रातील साठ्यांच्या बरोबरीने आहेत. १९७० साली उत्तर समुद्रात मिळालेल्या ऊर्जा साठ्यांनी ब्रिटन, नॉर्वे व इतर युरोपियन देशांच्या अर्थव्यवस्था सुधारल्या आहेत. आर्थिक निर्बंधामुळे रशियाचा तेल उत्खननाचा वेग मंदावू शकतो; पण क्रिमियाचा हा साठा उपलब्ध झाल्यामुळे रशियाला कोणीही रोखू शकत नाही. रशिया आक्रमक आहे, त्यांनी आधीच इंधनाच्या दोन रिग्ज ताब्यात घेतल्या आहेत. (वृत्तसंस्था)
क्रिमियाचा ताबा; रशियाला मिळाले तेल व वायूचे साठे
By admin | Published: May 19, 2014 3:47 AM