- लोकमत न्यूज नेटवर्क
जगभरात लोकांनी आज स्वत:ला घरात कोंडून घेतलं असल्यानं ठिकठिकाणच्या पारंपरिक गुन्हेगारीचा दरही मोठय़ा प्रमाणात घटला आहे. केवळ भारतातच नाही, जगभरात हीच स्थिती आहे. चोर्या, लुटमार, घरफोड्या, लोकांना रस्त्यांत एकटंदुकटं गाठून त्यांना लुटणं, महिलांच्या अंगावरचं सोनं, त्यांचे दागिने लुटून पसार होणं. अशा घटना सगळीकडेच घडत असतात. पण कोरोनाच्या भीतीनं लोकं आणि गुन्हेगारही आता फारसं घराबाहेरच पडत नसल्यानं पारंपारिक गुन्हेगारीला आपोआपच आळा बसला आहे. युरोपात तर कोरोनाचा प्रसार मोठय़ा वेगानं होत असल्यानं तिथल्या पारंपरिक गुन्हेगारीत लक्षणीय घट झाली आहे. यासंदर्भात स्पेनच्या पोलीस खात्याचे उपसंचालक सांगतात, आमच्याकडे या गुन्हेगारीचा दर कधी नव्हे एवढा कमी झाला आहे. या गुन्ह्यांचं प्रमाण तब्बल पन्नास टक्क्यांच्याही खाली आलं आहे. स्वीडनच्या पोलीस अधिकार्यांचं म्हणणं आहे. या नेहमीच्या गुन्ह्यांमध्ये, त्यांचा शोध घेण्यात आमचा प्रचंड वेळ जायचा, सुदैवानं तो वेळ आम्हाला आता आमच्या देशांतील कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी, कायदा-सुव्यवस्था पाहण्यासाठी वापरता येतोय.ऑस्ट्रियाचे अंतर्गत मंत्री कॅरी नेमर यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला असला तरी, गुन्हेगार आता आपली मोडस ऑपरेंडी बदलत असून नव्या गुन्हेगारीचा, विशेषत: ऑनलाइन गुन्हेगारीकडे ते वळले आहेत. र्जमनीच्या काही गुन्हेगारांनी तर निनावी, बनावट नावानं आपली आपबिती कथन करताना म्हटलं आहे, ठीक आहे, आमचा ‘धंदा’ वेगळा आहे, पण आम्हीही माणूसच आहोत ना, कोरोनाच्या काळात निदान आम्हाला जगण्यापुरतं तरी ‘खायला’ देणार की नाही? आमच्यावर असा अन्याय करू नका.