नवी दिल्ली - गेल्या काही वर्षांमध्ये नैसर्गिक आपत्तींमुळे त्रस्त झालेल्या जगाला आता येणाऱ्या वर्षांमध्ये अजून काही आपत्तींचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे. आपल्या एका रिपोर्टमध्ये संयुक्त राष्ट्रांनी ही माहिती दिली आहे. संयुक्त राष्ट्र आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने आपल्या रिपोर्टमध्ये सांगितले की, हे जग २०१५ पासून दरवर्षी सुमारे ४०० आपत्तींचा सामना करत आहे. ज्यांची संख्या २०३० पर्यंत वाढून ५६० पर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. तसेच जर १९७० ते २०००च्या दरम्यानचा कालावधी पाहिला तर मध्यम आणि मोठ्या आपत्तींचे प्रमाण ९० ते १०० पर्यंत मर्यादित होते.
या वर्षाच्या विचार केल्यास गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक तीव्र उन्हाळा जाणवत आहे. त्याची सुरुवातसुद्धा लवकर झाली आहे. जर हीच परिस्थिती राहिली तर २०३० पर्यंत उष्ण हवांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढेल. २००१ च्या तुलनेत हे प्रमाण तीन पटींने वाढणार आहे. तसेच दुष्काळ पडण्याचे प्रमाणही ३० टक्क्यांपर्यंत वाढणार आहे. वातावरणातील बदलांमुळे केवळ नैसर्गित आपत्तींचे प्रमाणच वाढणार नाही तर कोविड-१९, आर्थिक मंदी, अन्नटंचाई यासारख्या आपत्तींचं कारणही वातावरणातील बदल हेच आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाच्या प्रमुख मामी मिजतोरी यांनी सांगितले की, जर आम्ही लवकरच यामध्ये संतुलन साधण्याचा प्रयत्न केला नाही, तर पुढे जे नुकसान होईल, याची भरपाई करणे किंवा त्याला सांभाळणे आपल्या अवाक्यात राहणार नाही. त्यांनी पुढे सांगितले की, समाजाला आपत्तींच्या जोखमींचा सामना करण्यासाठी आर्थिक स्तरावर पुन्हा विचार करण्याची आवश्यकता आहे. सध्या आपला ९० टक्के कोष हा आपातकालिन मदतीसाठी असतो. ६ टक्के पुनर्निर्माण आणि चार टक्के आपत्तीला रोखण्यावर खर्च होतो.
दरम्यान, या आपत्तींचा सर्वाधिक फटका हा श्रीमंत देशांपेक्षा गरीब देशांना बसत आहे. कारण हे देश आधीच आर्थिक रूपाने विपन्नावस्थेत आहेत. त्यात या नुकसानाची भरपाई राष्ट्राला विनाशाच्या उंबरठ्यावर नेत आहेत. त्यामुळे यापासून बचाव करण्यासाठी येणाऱ्या आपत्तींचा सामना करण्यासाठी स्वत:ला तयार ठेवणे शिकले पाहिजे.