नवी दिल्ली – अफगाणिस्तान(Afghanistan) वर कब्जा केल्यानंतर तालिबान(Taliban)ने त्यांच्या सरकारचा अजेंडा तयार करण्यास सुरूवात केली आहे. तालिबानच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, तालिबानच्या नव्या सरकारने सर्व नागरिकांना माफी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचसोबत महिलांनीही सरकारशी मिळून काम करावं असं आवाहन तालिबाननं केलं आहे.
स्थानिक वृत्त एजेन्सीनुसार, इस्लामिक अमीरात कल्चरल कमिशनचे एनामुल्लाह यांनी एका टीव्ही चॅनेलवर मुलाखतीवेळी ही घोषणा केली. तालिबान नव्या सरकारमध्ये महिलांचा समावेश करेल. त्याचसोबत कुठलीही महिला हिंसाचाराला बळी पडू नये असं तालिबानने म्हटलं आहे. परंतु अफगाणिस्तानात तालिबानचं नवं सरकार कसं गठीत होणार? काय फॉर्म्युला असणार? यावर तालिबानने स्पष्ट सांगितले नाही.
तसेच आमचं नेतृत्व पूर्णपणे इस्लामिक असेल आणि सर्वांना समाविष्ट करून घेतलं जाईल असं तालिबानने म्हटलं आहे. अफगाणिस्तानात सध्या महिला आणि लहान मुलांच्या भविष्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. त्यावेळी तालिबानने हे विधान केले आहे. अफगाणिस्तानात तालिबानचं राज्य येताच देशातील विविध विविध भागात अनेक बदल झाल्याचं पाहायला मिळत आहे. भिंती, होर्डिंग्सवर ज्याठिकाणी महिलांचे फोटो लागले होते. त्याठिकाणी लोकं स्वत:हून रंग लावताना दिसत आहेत. कारण तालिबानी नियमानुसार महिलांनी बुरखा घालणं गरजेचे आहे. अफगाणिस्तानात शरिया कायदा लागू करण्याचे संकेत तालिबानने दिले आहेत.
तालिबानकडून अफगाणिस्तानच्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याचं आवाहन केले आहे. सर्व लोकांना त्यांचा दिनक्रम सुरू ठेवावा. कुणालाही काहीही नुकसान होणार नाही असं तालिबानकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. दरम्यान तालिबानने इतर देशांनाही आश्वासन दिलं आहे की, अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर कुठल्याही देशाविरुद्ध केला जाणार नाही.
तालिबानची भारताला ऑफर
पाकिस्तानच्या एका चॅनेलशी बोलताना तालिबानी नेत्याने अफगाणिस्तानच्या जमिनीचा वापर दुसऱ्या देशांविरोधात करणार नाही असं आश्वासन दिले आहे. भारताने त्यांच्या योजना पूर्ण करायल्या हव्यात. तालिबानी प्रवक्ता सुहैल शाहीनने सांगितले की, कुठल्याही देशाविरोधात अफगाणिस्तानची जमिन वापरू देणार नाही. भारताने अफगाणिस्तानात त्यांच्या अर्धवट राहिलेले प्रकल्प पूर्ण करावेत असं तालिबानने सांगितले आहे. भारताने अफगाणिस्तानात बरीच गुंतवणूक केली आहे. परंतु त्यांनी तालिबानी सत्तेला मान्यता दिली नाही. परंतु आता परिस्थिती बदलली आहे असा प्रश्न तालिबानला विचारला होता. त्यावर आम्ही यापूर्वीच सांगितले आहे कुठल्याही देशाविरुद्ध आमच्या अफगाणिस्तानचा वापर केला जाणार नाही हे स्पष्ट आहे. दुसरं. जर भारताने अफगाणिस्तानात विकासाचे प्रकल्प बनवत असेल, निर्माण करत असेल तर त्यांनी ते करावे कारण ते जनतेसाठी आहेत. तालिबानचे प्रवक्ते सुहैल शाहीन म्हणाले की, परंतु कुणीही अफगाणिस्तानची जमीन स्वत:च्या फायद्यासाठी, त्यांच्या देशाच्या स्वार्थासाठी वापरत असेल तर आम्ही त्याला परवानगी देणार नाही असंही तालिबाने म्हटलं आहे.