BBC journalist wife daughters killing, Kyle Clifford: ब्रिटनची राजधानी लंडनमध्ये मंगळवारी संध्याकाळी तीन महिलांची तीर मारून धनुष्यबाणासारख्या शस्त्राने हत्या करण्यात आली. बीबीसी पत्रकाराची पत्नी आणि त्यांच्या दोन मुली अशी तिघांचीही ओळख पटली आहे. संशयित मारेकरी पोलिसांना सापडला असून, त्याचे नाव काइल क्लिफर्ड असे आहे. तो २६ वर्षांचा आहे. आरोपी मारेकरी कदाचित लंडन किंवा हर्टफोर्डशायरच्या शेजारील काउंटीमध्ये असेल, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात होता. त्यानुसार शोध घेतल्यावर त्याला ताब्यात घेण्यात आले. हर्टफोर्डशायरच्या बुशे येथील घरात तीन महिलांवर हल्ला झाल्याचे वृत्त समजले. त्या तिघीही गंभीर जखमी झाल्या आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला.
तिहेरी हत्याकांडातील बळींची ओळख बीबीसी रेसिंग समालोचक जॉन हंट यांची पत्नी कॅरोल हंट आणि दोन मुली अशी आहे, असे ब्रिटनच्या सार्वजनिक प्रसारकाने बुधवारी सांगितले. पत्रकाराची पत्नी ६१ वर्षांची तर मुली २५ आणि २८ वर्षांच्या होत्या अशी माहिती देण्यात आली आहे. ‘टार्गेटेड किलिंग’ म्हणजे लक्ष्य हेरून केलेली ही हत्या आहे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या तिहेरी हत्याकांडात क्रॉस-बो वापरण्यात आल्याचे मानले जात असले तरी इतर शस्त्रेही वापरली गेली असावीत, असे अंदाज पोलिसांनी बुधवारी बोलून दाखवला.
ब्रिटन गृहमंत्री काय म्हणाल्या?
ब्रिटनच्या गृहमंत्री यवेट कूपर यांनी सांगितले की, सुरू असलेल्या शोधाची संपूर्ण माहिती पोलिसांकडून त्या घेत आहेत. कूपर यांनी बुधवारी ट्विटरवरून सांगितले की, बुशे परिसरात काल रात्री तीन महिलांची हत्या होणे हे खरोखरच धक्कादायक आहे. मृत व्यक्तींच्या कुटुंब, मित्र आणि समुदायासोबत माझ्या सहवेदना आहेत. घडलेल्या प्रकारानंतर मी या तपासावर लक्ष ठेवून आणि मला संपूर्ण माहिती दिली जात आहे. मी लोकांना विनंती करते की त्यांनी या प्रकरणाशी संबंधित कोणतीही माहिती असल्याने ती हर्टफोर्डशायर पोलिसांना द्यावी.