ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 21 - सौदी अरेबियाचे राजे किंग सलमान यांनी मोहम्मद बिन नायेफ या आपल्या पुतण्याला युवराजपदावरुन हटवून त्याच्या जागी मोहम्मद बीन सलमान या आपल्या मुलाची युवराजपदावर निवड केली आहे. सौदीचा नवा युवराज मोहम्मद बीन सलमान 31 वर्षांचा आहे. राज परिवाराकडून प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे.
युवराज असल्याने मोहम्मद बीन नायेफ यांचा राजगादीवर पहिला हक्क होता. मोहम्मद बिन नायफे (57) यांना मंत्रीपदावरुनही हटवण्यात आले आहे. नवीन युवराज मोहम्मद बिन सलमान सध्या सौदीचे संरक्षणमंत्री आहेत. सलमान जानेवारी 2015 मध्ये सौदीच्या राजगादीवर बसले. तो पर्यंत मोहम्मद बिन सलमानबद्दल सौदी अरेबियात आणि बाहेर फार माहिती नव्हती. सलमान युवराज होते तेव्हा मोहम्मदकडे रॉयल कोर्टाची जबाबदारी होती.
सौदीच्या राजाकडे सर्वाधिकार असतात. किंग सलमान यांनी ज्या प्रकारे युवराजपदावर आपल्या मुलाची निवड केली त्याने राजपरिवारातही अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. कारण राजपरिवारात मोहम्मद बिन सलमानपेक्षाही अनेक वरिष्ठ आणि अनुभवी व्यक्ती होत्या. तेलाच्या पलीकडे जाऊन अर्थव्यवस्था उभारण्याचे सौदी अरेबियाचे प्रयत्न सुरु आहेत. त्यामध्ये मोहम्मद बिन सलमानची भूमिका महत्वाची राहणार आहे. मोहम्मद बिन सलमान तरुण असल्याने सौदी अरेबियातील तरुणाईला ते अधिक जवळचे वाटू शकतात असाही त्यांच्या नियुक्तीमागे एक कयास आहे.