मॉस्को - रशिया आणि युक्रेन यांच्यात सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. मात्र रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी उचललेल्या एका पावलामुळे खनिज तेलाच्या किमतीचा भडका उडण्याची शक्यता आहे. जागतिक विश्लेषक फर्म जेपी मॉर्गन चेस अँड कंपनीच्या विश्लेषकांनी जागतिक स्तरावर कच्च्या तेलाच्या किमती ३८० डॉलर प्रति बॅरलपर्यंत वाढण्याची शक्यता आहे.
ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार जेपी मॉर्गनचे अॅनॅलिस्टनी सांगितले की, अमेरिका अमेरिका आणि युरोपियन देशांच्या दंडात्मक कारवाईमुळे रशिया खनिज तेलाच्या उत्पादनामध्ये कपात करू शकते. त्यामुळे जागतिक स्तरावर तेलाची किंमत ३८० डॉलर प्रति बॅरलपर्यंत जाऊ शकते.
जी-७ देशांनी हल्लीच रशियाकडून कच्च्या तेलाच्या आयातीबाबत एक नवं धोरण ठरवलं होतं. त्यामध्ये रशियाकडून तेलाच्या आयातीला सशर्त मान्यता देण्यात येईल, असे ठरवण्यात आले. मात्र अट आहे की, या बदल्यात रशियाला देण्यात येणारी किमत आधी निश्चित केलेली असेल.
जेपी मॉर्गनचे अॅनालिस्ट सांगतात की, जी-७ देशांचा हा निर्णय युक्रेन युद्धाबाबत पुतीन यांचया आर्थिक स्थितीवर घाव घालणारा होता. मात्र रशियाची आर्थिक स्थिती सध्यातरी मजबूत आहे.
रिपोर्टनुसार इतर जगासाठी रशियाच्या या निर्णयाचे परिणाम खळबळजनक असू शकतात. कच्च्या तेलाच्या उत्पादनामध्ये दररोजच्या ३० लाख बॅरलच्या टंचाईमुळे लंडन बेंचमार्कवर तेलाची किंमत १९० डॉलर प्रति बॅरल पर्यंत पोहोचू शकते. तर कच्च्या तेलाचे उत्पादन ५० लाख बॅरल घटल्यास त्याची किंमत ३८० डॉलर प्रतिबॅरल पर्यंत जाऊ शकते.
रिपोर्टनुसार अमेरिका आणि युरोपियन देशांच्या या निर्णयामुळे रशिया हा शांत बसणार नाही. तसेच त्यांच्याकडून बदला घेतला जाण्याची शक्यता आहे. जर रशियाने तेलाची निर्यात कमी करण्यासाठी उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला तर त्यामुळे जगात खळबळ उडू शकते. मात्र सध्या तेलाच्या बाजाराचा कल हा रशियाच्या बाजूने आहे.