ऑनलाइन लोकमत
पॅरीस, दि. १४ - पॅरीसमधल्या दहशतवादी हल्ल्यासाठी फ्रान्सचे अध्यक्ष फ्रँकस होलांद यांनी इस्लामिक स्टेटला जबाबदार धरले आहे. या हल्ल्यामध्ये १२७ जण ठार झाले असून १०० पेक्षा जास्त जण जखमी झाले आहेत आणि त्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.
या दहशतवादी हल्ल्याचं नियोजन विदेशात झालं, परंतु या दहशतवाद्यांना फ्रान्समधून मदत मिळाल्याचं होलांद यांनी म्हटलं आहे. होलांद यांनी तीन दिवसांचा दुखवटा जाहीर केला आहे. तसेच त्यांनी सोमवारी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. हा हल्ला म्हणजे इस्लामिक स्टेटच्या जिहादींनी छेडलेलं युद्ध असल्याचं होलांद म्हणाले.
खेळाचे मैदान, कॉन्सर्ट हॉल आणि कॅफे या ठिकाणांवर इस्लामिक स्टेट या दहशतवादी संघटनेने केलेले हल्ले हे युद्ध असून ज्या मूल्यांसाठी आम्ही झटतो त्या विरोधातला हा हल्ला असल्याचं ते म्हणाले. यापढे फ्रान्स अत्यंत निर्दयतेने इस्लामिक स्टेटचा मुकाबला करेल असंही होलांद म्हणाले. सीरिया, इराक व अन्य देशांमध्ये इस्लामिक स्टेटविरोधात फ्रान्स सध्या लढत आहे. त्याचा बदला म्हणून हा हल्ला करण्यात आल्याचं मानण्यात येत आहे.