बगदाद : इराकमधील अल्पसंख्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या याझदी समूहावर अत्याचाराचा कळस इसिसने वा इस्लामिक स्टेट्सने गाठला असून, इसिसच्या ताब्यात असणाऱ्या शेकडो याझदी ओलिसांची मोसूलजवळ ताल अफार येथे हत्या करण्यात आली आहे. याझदी प्रोग्रेस पार्टीने यासंदर्भात निवेदन प्रसिद्ध केले असून, त्यानुसार ताल अफार जिल्ह्यात ३०० पेक्षा जास्त याझदी ओलिसांना मारण्यात आले. गेल्यावर्षी इसिसने याझदी गटाच्या हजारो सदस्यांना पकडले होते. त्यांना का व कसे मारण्यात आले याचे तपशील अद्याप मिळालेले नाहीत. इराकचे उपाध्यक्ष, ओसामा अल नजाफी यांनी हे हत्याकांड नृशंस व भयानक असल्याचे म्हटले आहे. निवेदनात या हत्याकांडाचा निषेध केला असून, इसिसच्या ताब्यात असणाऱ्या याझदी नागरिकांची इराकी सैनिकांनी सुटका करावी, असे आवाहन केले. याझदी लोकसंख्या असलेला सिंजार जिल्हा इस्लामिक स्टेट्सच्या ताब्यात गेल्यानंतर हजारो याझदी कुर्दांच्या ताब्यातील उत्तर इराकमध्ये पळाले आहेत, तर याझदी महिलांनाही इसिसने ताब्यात घेतले असून, त्यांचा वापर गुलामाप्रमाणे करून घेण्यात येत आहे. (वृत्तसंस्था)