एखादी व्यक्ती मृत्यूनंतर खरोखरच पुन्हा जिवंत होऊ शकते का? हा प्रश्न एवढ्यासाठी की, मृत्यूनंतर पुन्हा जिवंत होण्याच्या आशेने अनेकांचे मृतदेह बर्फात ठेवले जात आहेत. विशेष म्हणजे, आपल्या मृत्यूनंतर आपला मृतदेह दीर्घकाळापर्यंत सुरक्षित ठेवला जावा, यासाठी लोक अक्षरशः लाखो रुपये खर्च करून शवागृहात जागा बूक करत आहेत. या संपूर्ण योजनेला क्रायोनिक्स स्कीम (Cryonics Scheme) असे नाव देण्यात आले आहे. आपल्याला आश्चर्य वाटेल, पण अनेकांनी जिवंत असतानाच यासाठी बुकिंग केले आहे. याशिवाय, अनेकांनी अर्जही करून ठेवले आहेत. जाणून घेऊयात नेमकी काय आहे ही योजना?
लंडनमध्ये नुकताच एका 50 वर्षीय व्यक्तीचा कॅन्सरने मृत्यू झाला. आपला मृतदेह क्रायोनिक्स स्किमअंतर्गत सुरक्षित ठेवला जावा अशी तिची इच्छा होती. जेणेकरून एक दिवस पुन्हा जिवंत होता येईल. या व्यक्तीच्या इच्छेनुसार, क्रायोनिक्स इंस्टिट्यूटचे (Cryonics Institute) एक्सपर्ट आले आणि संबंधित व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्याऐवजी तिला बर्फात पॅक केले. बॉडी परफ्यूज करण्यात आली आणि शरिरातील रक्त आणि पाण्यावर प्रक्रिया करून त्यांचे रुपांतर क्रायो प्रोटेक्शन मिश्रनात (Cryo Protection Mixture) करण्यात आले. यामुळे मृदेह बर्फात असूनही गोठत नाही आणि एखाद्या जिवंत माणसाप्रमाणे सुरक्षित राहतो. यानंतर तो विमानतळावर नेण्यात आला आणि तेथून क्रायोनिक्स संस्थेच्या शवागारात ठेवण्यात आला आहे.
असे आहे संपूर्ण प्रकरण -क्रायोनिक्स शवागृहात मृतदेह ठेवण्यासाठी मोठ-मोठे ब्लॉक तयार करण्यात आले आहेत. यात बॉडी लिक्विड नायट्रोजनमध्ये –196 डिग्री सेल्सियसमध्ये ठेवली जाते. भविष्यात असे काही तंत्रज्ञान विकसित होईल, ज्याद्वारे मृत व्यक्तीला पुन्हा जिवंत केले जाऊ शकेल, या आशेने हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. असे झाल्यास या लोकांना सर्वप्रथम जिवंत केले जाईल. तसेच, ज्या आजारामुळे त्यांचा मृत्यू झाला त्यावर उपचार करण्यातही यामुळे मदत होईल. ज्या लोकांचे मृतदेह या शवागृहात ठेवण्यात आले आहेत, त्यांना विद्यार्थी, शेफ, सचिव आणि प्राध्यापकांचा समावेश आहे. आत्तापर्यंत 250 हून अधिक लोकांनी आपले मृतदेह येथे ठेवण्यासाठी बुकिंग केले आहे. यांपैकी बहुतेक अमेरिकन आहेत. यानंतर अनेक जण ब्रिटनमधील आहेत. 50 हून अधिक लोक प्रतीक्षेत आहेत. अनेकांनी आपल्या पाळीव प्राण्यांसाठीही बुकिंग केले आहे.
जर एखादी व्यक्ती 1085 व्या वर्षी जिवंत झाली तर...?क्रायोनिक्सच्या तज्ज्ञांना या प्रयोगात आशेचा कीरण दिसत आहे. तर दुसरीकडे यावर टीका करणारेही कमी नाहीत. अनेकांना हा मूर्खपणा वाटत आहे. यासंदर्भात बोलताना डॉक्टर मिरियम स्टॉपर्ड म्हणाल्या की, ही मृतदेहाची विटंबना आहे. लोकांनी असे करू नये. मात्र, क्रायोनिक्सचे वयाने सर्वात मोठे असलेले 85 वर्षीय तज्ज्ञ ॲलन सिंक्लेअर म्हणतात, जर कुणी 185व्या वर्षे अथवा वयाच्या 1085व्या वर्षी जिवंत झाले तर किती आश्चर्याची गोष्ट ठरेल...?
रिया एटिंजर नावाच्या एका रुग्णाने 1977 मध्ये पहिल्यांदा येथे बुकिंग केले होते. क्रायोनिक्स संस्थेचे अध्यक्ष डेनिस कोवाल्स्की म्हणाले, हे जुगार खेळण्यासारखे आहे. चमत्कार केव्हा होईल हे सांगता येत नाही. मात्र गमतीची गोष्ट म्हणजे, लोकांमध्ये याविषयी प्रचंड उत्सुकता आहे.