अमेरिकेसारख्य़ा महासत्तेला अनेक दशके कडवी टक्कर देणाऱ्या कॅरेबियन बेटांवरील छोटासा देश क्युबामध्ये नुकतीच सार्वजनिक इंटरनेट सुविधा सुरु झाली. या देशातील नागरिक अनेक वर्षे इंटरनेटपासून दूर होते. या देशात आधीही इंटरनेट होते. मात्र, त्याचा वापर मर्यादित होता. इंटरनेट सेवा नसणारा हा जगातील शेवटचा देश होता.
क्युबामध्ये थ्रीजी इंटरनेट सेवा सुरु करण्यात आली असून टेलिकॉम कंपनी ETECSA ही सेवा देत आहे. या कंपनीने इंटरनेटचा प्लॅनही जाहीर केला असून नागरिकांना प्रती महिन्यासाठी 30 डॉलर म्हणजेच 2100 रुपये भरावे लागणार आहेत. यामध्ये केवळ 4 जीबी डेटा मिळणार आहे.
क्युबाची लोकसंख्या 1.12 कोटी आहे. यातील केवळ 50 लाख लोकच मोबाईल वापरतात. येथील सर्वाधिक लोक मजुरी करून उदरनिर्वाह करतात. महत्वाचे म्हणजे क्युबातील नागरिकांची सरासरी मजुरी 30 डॉलर आहे. मात्र, काही मजुरांना यापेक्षाही कमी मजुरी मिळते. अशा वेळी येथील लोकांना इंटरनेटचा प्लॅन हा आवाक्याबाहेरचाच ठरणार आहे.
क्युबामध्ये याआधीही इंटरनेट सुविधा मिळत होती. मात्र, त्याचा वापर सर्वच करू शकत नव्हते. 2013 पर्यंत इंटरनेट केवळ महागड्या हॉटेलांमध्येच मिळत होते. कारण पर्यटक त्याचा वापर करू शकतील. यानंतर 2017 मध्ये देशभरात वाय-फाय आणि इंटरनेट कॅफे सुरु करण्यात आले. सध्या क्युबामध्ये 1200 वायफाय हॉटस्पॉट आहेत ज्याचा वापर 20 लाख लोकच करतात.
भारतात 3 रुपयांच 1 जीबी डेटा मिळतो. तर या क्युबामध्ये यासाठी 525 रुपये मोजावे लागणार आहेत. भारतात 4 जी सेवेने विस्तार केला असून 5 जी सेवाही येऊ घातली आहे.