नवी दिल्ली : डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने देशभरात टीका सुरु असताना परदेशात फिरायला जाण्यास इच्छुकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. भारतीय रुपयाप्रमाणेच इतर देशांच्या चलनातही मोठी घसरण झाल्याने तेथील देशांमध्ये फिरायला जाणे भारतीयांना परवडणार आहे.
तुर्कस्तानमध्ये सध्या मोठे आर्थिक संकट आले आहे. यामुळे तेथील चलन लिरा खूपच घसरले आहे. तर भारताचा रुपया हे डॉलरच्या तुलनेत सर्वाधिक घसरणारे आशियातील चलन आहे. यामुळे ज्या देशांच्या चलनांच्या तुलनेत रुपया अद्याप मजबूत आहे, त्या देशांमध्ये फिरायला जाणे केव्हाही स्वस्त ठरणार आहे.
एका अर्थतज्ज्ञांनुसार दक्षिण ऑफ्रिकेचे रँडमध्ये 10 टक्के, तुर्कस्तानच्या लिरामध्ये 60 टक्के आणि इंडोनेशियाच्या रुपयामध्ये 4 ते 5 टक्क्यांची घसरण झाली आहे. यामुळे भारतीय पर्यटकांना या देशांमध्ये जाणे अधिक सोईस्कर होणार आहे. या हिवाळ्यामध्ये दक्षिण ऑफ्रिका, तुर्कस्तान, इजिप्त आणि बाली या देशांसाठी पर्यटकांची रीघ लागणार आहे.
यात्रा डॉट कॉमनुसार सध्या तुर्की, इंडोनेशिया, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांना पर्यटकांची वाढती मागणी आहे. तर लंडन, युरोप, सिंगापूर आणि हाँगकाँग या देशांची मागणी कमी होत आहे. कारण तेथील चलन रुपयाच्या तुलनेत अद्यापही मजबूत आहे.
डॉलर, युरो सारख्या चलनांसोबत ऑस्ट्रेलियाचा डॉलरही जवळपास स्थिर राहिला आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियाचा डॉलरच्या तुलनेत रुपया 51 वर होता. तर मागील वर्षी 60 रुपये होती. यामुळे ऑस्ट्रेलियाला जाणाऱ्यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे.