नवी दिल्ली : अमेरिकेतील फ्लोरिडा येथे चक्रीवादळाने धुमाकूळ घातला आहे. अमेरिकेच्या धरतीवर धडकलेल्या 'इयान' चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. या वादळामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून मोठी जीवितहानी होत आहे. येथील 20 लाखांहून अधिक घरे वीजेअभावी अंधारात आहेत. हे भयानक वादळ अमेरिकेतील आतापर्यंतच्या सर्व वादळांपैकी सर्वात धोकादायक असल्याचे बोलले जात आहे. गुरुवारी 29 सप्टेंबर रोजी सकाळी या वादळाचा वेग ताशी 241 किलोमीटर इतका होता, या वादळात रिपोर्टींग करत असलेला पत्रकार सापडल्याचे पाहायला मिळाले, ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल झालेल्या व्हिडीमध्ये रिपोर्टर मोठ्या धाडसाने आपला जीव वाचवताना दिसत आहे.
पत्रकार मोठ्या वादळामध्ये लाईव्ह रिपोर्टींग करत असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. तेवढ्यात वादळाचा वेग अचानक वाढतो आणि रिपोर्टर मोठ्या धाडसाने स्वत:ला वाचवतो. यादरम्यान झाडाची एक डहाळी उडत येते आणि त्याच्या पायापाशी येऊन अडकते. तो ती डहाळी बाजूला करून पुढे सरकतो आणि खांबाला धरून उभा राहतो. लक्षणीय बाब म्हणजे तरीदेखील वादळी वाऱ्यात रिपोर्टर आपले रिपोर्टिंग चालू ठेवतो. वादळात अडकलेल्या या रिपोर्टरचे नाव जिम कॅंटर असून तो एका हवामान विभागाशी संबंधित वृत्तवाहिनीसाठी काम करतो.
'इयान' चक्रीवादळाने घातला धुमाकूळ अमेरिकेत आलेले हे धोकादायक वादळ आज म्हणजेच 29 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजता नेपल्सच्या दक्षिण-नैऋत्येस 105 किमी अंतरावर होते. ते ताशी तब्बल 17 किलोमीटर वेगाने पुढे जात होते, याबाबत माहिती देताना फ्लोरिडाचे गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी बुधवारी 28 सप्टेंबर रोजी सांगितले की, "हे एक मोठे वादळ आहे ज्यामुळे लोकांच्या जीवाला धोका आहे." वाटेत येणाऱ्या सर्व शहरांतील लोकांना त्यांनी सुरक्षित ठिकाणी जाण्यास सांगितले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, इयान चक्रीवादळाचा इशारा सुमारे 350 किमी क्षेत्रासाठी जारी करण्यात आला आहे, ज्यामध्ये टँपा आणि सेंट पीटर्सबर्गचाही समावेश आहे.