बँकॉक : चक्रीवादळ मोचामुळे म्यानमारमध्ये १४५ लोकांचा मृत्यू झाला असून, १ लाख ८५ हजारांहून अधिक इमारतींचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ‘एमआरटीव्ही’ या सरकारी दूरचित्रवाणीने शुक्रवारी ही माहिती दिली. तथापि, जीवित व वित्तहानीचे एकत्रित चित्र अद्यापही स्पष्ट नाही.
मृतांचा हा आकडा राखीन प्रांतातील आहे. या प्रांताला मोचाचा सर्वाधिक फटका बसला. देशाच्या इतर भागांनाही मोचाची झळ बसली आहे. तथापि, तेथील हानीची माहिती अद्याप गोळा करायची आहे. दरम्यान, लष्करी सरकारने वादळामुळे ४०० हून अधिक मृत्यूचा दावा करणारी आकडेवारी खोटी असल्याचे म्हटले आहे.
गेल्या रविवारी बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या मोचा चक्रीवादळाने बांगलादेश व म्यानमारच्या राखीन राज्यात जोरदार वारे वाहण्यासह मुसळधार पाऊस झाला होता. राखीन राज्यात घरे आणि पायाभूत सुविधांची प्रचंड हानी झाली आहे.