इस्लामाबाद: भारताला धडा शिकवण्याची भाषा करणाऱ्या, काश्मीरमध्ये कायम कुरघोड्या करणाऱ्या पाकिस्तानची आर्थिक परिस्थिती अधिकाधिक बिकट होत आहे. पाकिस्तानमध्येमहागाईचा भडका उडाला आहे. भाज्या, पेट्रोल, डिझेलचे दर आकाशाला भिडले आहेत. यात आता दुधाची भर पडली आहे. कराची डेयरी फार्मर्स असोसिएशननं दुधाच्या दरात अचानक प्रति लीटर 23 रुपयांनी वाढ केली. त्यामुळे पाकिस्तानमध्ये दुधाचा दर 180 रुपयांवर पोहोचला आहे. दुधाच्या दरात मोठी वाढ झाल्यानं पाकिस्तानी जनता मेटाकुटीला आली. पाकिस्तानी रुपयाचं मूल्य भारतीय रुपयाच्या तुलनेत निम्मं आहे. पाकिस्तानी जनता आधीच महागाईनं त्रस्त आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तू असलेल्या दूधाच्या दरात थेट 23 रुपयांची वाढ झाल्यानं सर्वसामान्य जनतेचं आर्थिक गणित कोलमडलं आहे. 'सरकारकडे वारंवार दूधाच्या दरात वाढ करण्याची परवानगी मागितली होती. मात्र त्यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्यानं आम्ही स्वत:च दूधाच्या दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला,' अशी माहिती कराची डेयरी फार्मर्स असोसिएशननं दिली. चारा, इंधनासह अनेक वस्तूंच्या किमती वाढल्याचा प्रतिकूल परिणाम होत असल्याचं कराची डेयरी फार्मर्स असोसिएशनच्या एका पदाधिकाऱ्यानं 'डॉन न्यूज'ला सांगितलं. हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी आम्ही सरकारच्या काही पदाधिकाऱ्यांना भेटलो. मात्र त्यांनी काहीच केलं नाही, अशा शब्दांमध्ये त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली. दुसऱ्या बाजूला प्रशासनानं असोसिएशनचा हा निर्णय चुकीचा असल्याचं म्हटलं. प्रशासनाकडून दुधासाठी लीटरमागे 94 रुपयांचा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र तरीही किरकोळ विक्रेते एक लीटर दूध 100 ते 180 रुपयांना विकत आहेत. अशा विक्रेत्यांवर कारवाई केली जात असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात आलं.
पाकिस्तानात महागाईचा कहर; दूध 180 रुपये लीटर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2019 6:08 PM