वॉशिंग्टन : युक्रेनमध्ये रशियाच्या सैन्याने आक्रमण केले आहे. यामुळे अमेरिका, ब्रिटनने रशियाविरोधात कठोर निर्बंध लादण्याची घोषणा केली आहे. या निर्बंधांमुळे रशियाच्या आक्रमकतेत कमी येईल, यामुळे रशियाला झुकविता येईल, असे अमेरिकेला वाटत आहे. याची जबाबदारी अमेरिकेने एका भारतीयावर सोपविली आहे.
दलीप सिंग (Daleep Singh) हे मूळ भारतीय आहेत. ते बायडन प्रशासनामध्ये आर्थिक सल्लागार आहेत. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी युक्रेनची दोन शहरे तोडून स्वतंत्र देश बनविल्याची घोषणा केली. यामुळे या भागात आणखी तणाव वाढला आहे. दोनेत्स्क आणि लुहांस्क यांना स्वतंत्र देशाची मान्यता दिली आहे. यानंतर पुतीन यांनी रशियाच्या सैन्याला युक्रेनमध्ये घुसण्याचे आदेश दिले आहेत. क्रेमलिनने याला शांतीरक्षा मोहीम असे नाव दिले आहे.
दलीप सिंग हे आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रासाठी उप राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार तसेच राष्ट्रीय आर्थिक परिषदेचे उप संचालक देखील आहेत. गेल्या काही दिवसांपासून ते व्हाईट हाऊसच्या वार्ता कक्षात दुसऱ्यांदा दिसले आहेत. लोकांची मागणी वाढल्याने त्यांना पुन्हा आणण्यात आल्याचे प्रेस सचिव जेन साकी यांनी सांगितले.
सिंग यांनी आपल्या संबोधनात म्हटले की, युक्रेनवर रशियाने हल्ला सुरु केला आहे. याचे प्रत्यूत्तर देण्यात आम्ही सुरुवात केली आहे. सहकारी देशांशी सल्लामसलत करून रशियावर निर्बंध लादण्यात आले आहेत. यासाठी बराच वेळ घेतला गेला. जर्मनीसोबत रात्रभर बैठका सुरु होत्या. यामध्ये ‘नॉर्ड स्ट्रीम-2’ च्या नैसर्गिक गॅस पाईपलाईनचा प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. यामुळे रशियाचे या प्रकल्पातील ११ अब्ज अमेरिकी डॉलर बुडणार आहेत. तसेच रशियाच्या मोठ्या बँका आणि मोठ्या उद्योजकांवर निर्बंध लावण्यात आले आहेत.