पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या युरोप दौऱ्यावर आहेत. सोमवारी मोदी यांनी जर्मनीहून डेन्मार्क गाठले. कोपनहेगनमध्ये मोदी यांनी डेन्मार्कच्या पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन यांची भेट घेतली. यानंतर काही फोटो समोर आले यात मोदी या महिला पंतप्रधानांसोबत बगिचामध्ये दिसत आहेत. यावेळी या दोघांमध्ये काय चर्चा झाली हे समजले नसले तरी या महिला कोण याबाबत चर्चा सुरु झाली आहे.
या त्याच महिला पंतप्रधान आहेत, ज्यांनी अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल़्ड ट्रम्प यांना सुनावले होते. डेन्मार्क नाटोचा सदस्य आहे आणि अलीकडेच रशियाने आपल्या हवाई हद्दीत घुसखोरी केल्याचा आरोप केला आहे. युक्रेनवर हल्ला केल्यानंतर रशिया सातत्याने नाटो देशांना इशारा देत आहे. त्यातच रशियाचा मित्र असलेल्या भारताचे पंतप्रधान मोदी या देशांमध्ये पोहोचले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी डेन्मार्कच्या राणी मार्गेथ यांचीही भेट घेतील.
डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिक्सन गेल्या वर्षी तीन दिवसांच्या भारत भेटीवर आल्या होत्या. त्यांनी नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांची भेट घेतली होती. फ्रेड्रिक्सन या जून 2019 पासून डेन्मार्कच्या पंतप्रधान आहेत आणि जून 2015 पासून डेन्मार्कच्या मध्य-डाव्या समाजवादी डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेत्या आहेत. फ्रेड्रिक्सनचा जन्म 19 नोव्हेंबर 1977 रोजी डेन्मार्कमधील अलबोर्ग येथे झाला. डेन्मार्कच्या इतिहासातील त्या सर्वात तरुण आणि दुसऱ्या महिला पंतप्रधान आहेत.
2019 मध्ये फ्रेडरिकसन यांनी ग्रीनलँड विकण्याची ऑफर नाकारली आणि पहिल्यांदा प्रसिद्धीच्या झोतात आल्या. या त्यांच्या निर्णयामुळे अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी डेन्मार्कचा दौरा रद्द केला होता. त्या रशिया-युक्रेन युद्धातही सक्रिय आहेत. 21 एप्रिल रोजी त्यांनी स्पॅनिश पंतप्रधान पेड्रो सांचेझसह युक्रेनची राजधानी कीवला भेट दिली होती. डेन्मार्कने युक्रेनियन लष्कराला 2,700 M72 LAW लाइट अँटी-टँक वेपन पाठविली आहेत.