‘पुलित्झर’ हा जगातील अतिशय प्रतिष्ठित आणि सन्मानाचा असा पुरस्कार आहे. हा पुरस्कार आपल्याला मिळावा, यासाठी अनेक रथी-महारथी या पुरस्काराकडे डोळे लावून बसलेले असतात. त्यासाठी प्रचंड मेहनतही घेतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात जगभरातील हा सर्वात मोठा पुरस्कार मानला जातो. मोठमोठ्या नामांकित पत्रकारांना वर्षानुवर्षांच्या मेहनतीनंतर हा पुरस्कार मिळाला आहे. पत्रकारितेतील विविध क्षेत्रांबाबत हा पुरस्कार दिला जातो. १९१७ मध्ये पहिल्यांदा हा पुरस्कार दिला गेला. अमेरिकेतीलही हा सर्वोच्च पुरस्कार आहे.
२०२१चे पुलित्झर पुरस्कार गेल्या आठवड्यात जाहीर झाले. त्यात दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट म्हणजे, भारतीय वंशाच्या अमेरिकन पत्रकार मेघा राजगोपालन यांना हा पुरस्कार मिळाला आहे. चीनने आपल्या डिटेन्शन कॅम्पमध्ये डांबून ठेवलेल्या लाखो मुस्लिमांचे सत्य त्यांनी जगासमोर उघड केले होते. प्रत्यक्ष चीनमध्ये जाऊन या छावण्यांमध्ये पाहणी, तपासणी करण्याची परवानगी न मिळाल्याने, मेघा राजगोपालन यांनी उपग्रह छायाचित्रांचा अभ्यास, विश्लेषण करून हे सत्य जगासमोर मांडलं होतं. भारतीय वंशाचे आणखी एक पत्रकार नील बेदी यांनाही यावेळी ‘लोकल रिपोर्टिंग कॅटेगरीमध्ये ‘पुलित्झर’ पुरस्कार मिळाला. त्यांनी फ्लोरिडा येथील लहान मुलांच्या तस्करीबाबत शोधपत्रकारिता केली होती. भारतासाठी ही गोष्ट नक्कीच अभिमानाची आहे, पण यापेक्षाही एक मोठी घटना यावेळी घडली.
अमेरिकेतील १७ वर्षांची एक कृष्णवर्णीय तरुणी. डार्नेला फ्रेजिअर तिचं नाव. ती पत्रकार नाही, छायाचित्रकार नाही, लेखक नाही, नाटककार नाही, तिनं अद्याप कुठलाही लेख कधी कुठल्या वर्तमानत्रात लिहिला नाही, शोधपत्रकारिता ही तर खूप दूरची गोष्ट, पण तरीही ‘पुलित्झर’ पुरस्कार समितीनं यंदा ‘स्पेशल अवॉर्ड’ देऊन तिला सन्मानित केलं. त्याचं कारणही तसंच होतं. गेल्या वर्षी अमेरिकेत २५ मे रोजी जॉर्ज फ्लॉइड या कृष्णवर्णीय तरुणाला पोलीस अधिकाऱ्याच्या क्रूरपणामुळे मृत्यूला सामोरं जावं लागलं होतं.
पोलीस अधिकारी डेरेक चौवीन यानं जॉजॅ फ्लॉइडची मान आपल्या गुडघ्याखाली जवळपास दहा मिनिटं दाबून ठेवली होती. श्वासासाठी तो कासावीस होत होता, तडफडत होता. ‘मला सोडा,’ म्हणून याचना करीत होता, प्राण सोडण्यापूर्वीचे त्याचे शेवटचे शब्दही होते, ‘आय कान्ट ब्रीद...मला श्वास घेता येत नाहीए...’ पण क्रूरकर्मा पोलीस अधिकारी डेरेकनं जॉर्जचा गुदमरून मृत्यू होईपर्यंत त्याला सोडलं नाही. ... या घटनेची प्रत्यक्ष साक्षीदार होती डार्नेला फ्रेजिअर.
आपल्या भावंडांसोबत खरेदीसाठी गेलेले असताना, अचानक तिच्या नजरेसमोर काहीतरी भयंकर घडलं. जॉर्ज फ्लॉइड प्राणाची भीक मागत असताना, डेरेकच्या डोळ्यांत आणि चेहऱ्यावर होतं क्रूर हसू... डार्नेलानं हे पाहताच, आपला स्मार्टफोन बाहेर काढला आणि त्यात या घटनेचं शूटिंग केलं. केवळ आठ मिनिटे ४६ सेकंदांचं हे शूट, पण कोणत्याही शब्दांपेक्षा, तलवारीच्या पात्यापेक्षाही ते अधिक धारदार सत्य होतं. डेरेक इकडे जॉर्जचा जीव घेत असताना, दुसरीकडे त्याच थंड आणि भेदक नजरेनं डार्नेलाकडेही बघत होता. जणू तो सांगत होता, ‘हा झाला की तुझा नंबर...’ पण तरीही डार्नेला डगमगली नाही. हात आणि कॅमेरा शक्य तितका स्थिर ठेवून तिनं या घटनेचं चित्रण केलं.
केवळ ही एक घटना, पण त्यामुळे केवळ अमेरिकेतच नव्हे, तर अख्ख्या जगात वादळ उठलं. लाखो लोक रस्त्यावर आले आणि अमेरिकेतलं आजवरचं सर्वात मोठं निषेध आंदोलन केलं. जगभरातील शेकडो देशातील लोकांनी रस्त्यावर येऊन या घटनेचा निषेध केला. तिच्या याच छोट्याशा व्हिडीओमुळे कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराच्या घटनांच्या सत्याला मूर्त रूप तर दिलंच, पण डेरेकलाही सजा होण्यात या व्हिडीओने महत्त्वाची भूमिका निभावली. त्याच्याविरुद्ध तिनं साक्षही दिली.
कुठलंही प्रशिक्षण नसताना, पत्रकारितेचा किंवा शूटिंगचा काहीही अनुभव नसताना, ज्या धिटाईनं तिनं हा व्हिडीओ शूट केला, त्याबद्दल अनेक जाणकारांनी डार्नेलाचं कौतुक करताना म्हटलंय...एकही शब्द नसलेली या दशकातली ही सर्वोत्तम डॉक्युमेंट्री आहे. डार्नेलाच्या या घटनेनं जगाला हेदेखील दाखवून दिलं आहे की, पत्रकारिता ही केवळ पत्रकारांची मक्तेदारी नाही. सर्वसामान्य माणूसही जागरूक असला, तर असामान्य भूमिका बजावताना उघडंनागडं सत्य जगासमोर आणू शकतो. डार्नेलाच्या या कृतीनं सत्याच्या मागे ठामपणे उभं राहण्याची हिंमतही सर्वसामान्य माणसांना दिली आहे.
मूक शब्दांना आवाज आणि हिंमत!
‘पुलित्झर’ पुरस्कार समितीनं डार्नेलाचं कौतुक करताना, एक विशेष प्रशस्तिपत्रही तिला दिलं आहे. त्यात म्हटलं आहे... डार्नेलानं ज्या धिटाईनं हा व्हिडीओ काढला, त्यामुळे केवळ अमेरिकेतीलच नव्हे, तर जगात जिथे-जिथे लोकांना पोलिसांच्या क्रौर्याला सामोरं जावं लागतं, लागलंय, त्यांच्या मूक शब्दांना तिनं आवाज दिला. त्या विरोधात उभं राहण्यास, निषेध आंदोलन करण्यास प्रवृत्त केलं. अन्यायाविरुद्धचा लोकांचा आवाज तिनं बुलंद केला. एक नागरिक म्हणून सत्य आणि न्यायाच्या शोधात एक महत्त्वपूर्ण भूमिकाही तिनं निभावली.