यरुशलम - इस्रायलची गुप्तचर यंत्रणा असलेल्या मोसादने आपला गुप्तहेर एली कोहेनच्या मृत्युचा पुरावा शोधून काढला आहे. सीरियामध्ये 50 वर्षांपूर्वी कोहेनला पकडून फाशी देण्यात आली होती. मात्र, मोसादने 50 वर्षानंतर कोहेनचे घड्याळ शोधल्याचा दावा केला आहे. त्यासाठी एक विशेष अभियान राबविण्यात आले होते. मोसादच्या या कामगिरीबद्दल इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहू यांनी ही कामगिरी धाडसी असल्याचे सांगत मोसादचे कौतूक केले आहे.
इस्रायलचा गुप्तेहर एली कोहेनच्या स्मर्णार्थ काही काही आठवड्यांपूर्वी वार्षिक समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या समारंभातच कोहेन यांच्या कुटुंबीयांना त्यांची आठवण म्हणून हे घड्याळ परत करण्यात आल्याचे सांगण्यात येते. मोसादचे प्रमुख योस्सी कोहेन यांनी हे घड्याळ मृत गुप्तहेर एली कोहनच्या कुटुंबाला दिले. सीरियामध्ये पकडण्यापूर्वीपासूनच कोहेन आपल्या हातात हे घड्याळ घालत होते. मिस्त्र येथे जन्मलेले कोहेन 1960 साली मोसाद या गुप्तचर संस्थेत भरती झाले. अरब देशांतील गुप्त माहिती मिळवण्यासाठी कोहेन सीरियात गेले होते. कोहेन यांच्या गुप्त माहितीमुळेच 1967 साली अरब-इस्रायल युद्धात इस्रायलचा विजय झाला होता, असे सांगण्यात येते. मात्र, 1964 मध्ये सीरियातील अधिकाऱ्यांनी कोहेन यांना अटक केली. त्यानंतर 18 मे 1965 साली सीरियाकडून कोहेन यांना फाशीवर लटकविण्यात आले.