सेंट काऊंट- राफेल करारात कोणताही घोटाळा झाला नसल्याचा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिल्यानंतर दसॉल्ट कंपनीनंही त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. भारतातल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मेक इन इंडियाच्या उपक्रमासाठी आम्ही समर्पित आहोत. रिलायन्स समूह आणि पूर्ण पुरवठा करणाऱ्या साखळीच्या माध्यमातून दसॉल्ट भारतात विमानांचं यशस्वी उत्पादन करण्याचा प्रयत्न करेल, असंही दसॉल्ट एव्हिएशननं सांगितलं आहे.
राफेल करारात कोणतीही अनियमितता नसल्याचं सांगत सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांनी सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. सरन्यायाधीश रंजन गोगोई, संजय किशन कौल आणि के. एम. जोसेफ यांच्या पीठाने दाखल याचिकांवर आज सुनावणी घेतली. या सुनावणीदरम्यानच त्यांनी या याचिका फेटाळून लावल्या. राफेल प्रकरणात हस्तक्षेप करण्यात सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. विमान खरेदी प्रक्रियेत कोणत्याही त्रुटी नाहीत. सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नसल्याचंही न्यायालयानं याचिकाकर्त्यांना सुनावलं आहे. सरकार खरेदी करत असलेल्या 126 विमान खरेदी प्रक्रियेत न्यायालय हस्तक्षेप करू शकत नाही. या प्रकरणातील प्रत्येक बारकाव्याची पडताळणी करणं न्यायालयाला शक्य नाही, असं सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी स्पष्ट केलं आहे.