पाकिस्तानचा 'सदाबहार' मित्र असलेल्या चीनने दासू धरण प्रकल्पाच्या (Dasu Hydropower Project) कामावरील ठार झालेल्या चिनी (china) अभियंत्यांसाठी, पाकिस्तानकडून 285 कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी केली आहे. पाकिस्तानी वृत्तपत्र बिझनेस रेकॉर्डरच्या वृत्तानुसार, रखडलेल्या प्रकल्पाचे काम पुन्हा सुरू करण्यापूर्वी, पाकिस्तानने (Pakistan) नुकसानभरपाई द्यावी, अशी चीनची इच्छा आहे. गेल्या 14 जुलै 2021 रोजी 9 चिनी अभियंते, दोन स्थानिक लोक आणि फ्रंटियर कॉन्स्टॅब्युलरीचे दोन कर्मचारी एका हल्ल्यात मारले गेले होते. या हल्ल्यात दोन डझनहून अधिक लोकही जखमी झाले होते. स्फोटकांनी भरलेल्या एका कारने प्रकल्पावर जाणाऱ्या टीमच्या बसला धडक दिली होती, यानंतर ही बस दरीत कोसळली होती. (Dasu Hydropower Project Pakistan China)
बिझनेस रेकॉर्डरच्या वृत्तानुसार, जलसंपदा सचिव शाहजेब खान बंगश यांच्या मते, जुलै महिन्यात चिनी अभियंत्यांवर झालेल्या हल्लापासून प्रकल्पाचे काम ठप्प आहे. तसेच, चिनी नागरिकांना भरपाई देण्यासंदर्भात उच्च स्तरावर चर्चा सुरू आहे.
परराष्ट्र मंत्रालय, अर्थ मंत्रालय, गृह मंत्रालय, जलसंपदा मंत्रालय आणि चीनी दूतावास भरपाई पॅकेजसह, या प्रकल्पावर पुन्हा काम करण्यासंदर्भात चर्चा करत आहेत. वृत्तपत्राने सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे, की संबंधित मंत्रालयाकडून या प्रकरणाबाबत एक समिती स्थापन करण्यात आली होती, जा समितीने दासू प्रकल्पाशी संबंधित नुकसानभरपाईवर चर्चा केली आहे. या समितीने सर्व मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक उपसमिती स्थापन केली आहे, ही उपसमिती चिनी दूतावासासोबत भरपाई पॅकेजवर चर्चा करेल. एक-दोन आठवड्यांत हा प्रश्न सुटेल आणि लवकरच प्रोजेक्टच्या कामाला पुन्हा सुरुवात होईल, अशी आशा जलसंपदा सचिवांनी व्यक्त केली आहे.
चिनी फर्म चायना गेझोउबा ग्रुप कॉर्प या कंपनीने हल्ल्यानंतर दासू प्रोजेक्टचे काम बंद केले होते. तसेच जोवर नुकसान भरपाई मिळणार नाही, तोवर काम सुरू केले जाणार नाही, असे या कंपनिने म्हटले आहे.