ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 20 - दाऊद इब्राहिमचा पुतण्या सोहेल कासकर याला दहशतवादाच्या आरोपाखाली अमेरिकेत अटक करण्यात आल्याचे वृत्त आहे. विदेशी दहशतवाद्यांना बेकायदेशीररीत्या शस्त्रास्त्रे विकण्याचा व त्यांना मदत करण्याचा त्याच्यावर आरोप आहे.
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार सोहेल व अन्य दोन पाकिस्तानी व्यक्तिंना अमेरिकेच्या ड्रग एन्फोर्समेंट अॅडमिनिस्ट्रेशनने अटक केली आहे. विशेष म्हणजे ही अटक डिसेंबर 2015 मध्येच झाली असून दाऊदने ही बातमी फुटू नये म्हणून आपले सामर्थ्य पणाला लावले होते, अशी माहिती सूत्रांच्या हवाल्याने टाइम्सने दिली आहे.
सोहेल हा दाऊदचा भाऊ नूराचा मुलगा आहे. दाऊदने सोहेलसाठी बडा वकिल दिला असून जर सोहेल दोषी आढळला तर त्याला आजन्म कारावासाची शिक्षा होऊ शकते. याचा अर्थ तो किमान 25 वर्षे तुरुंगात जाईल.
सोहेलची मॅनहॅटन फेडरल कोर्टात सुनावणी असून क्षेपणास्त्रांची बेकायदेशीर विक्री, अमली पदार्थांची तस्करी आदी आरोप आहेत. दाऊदसाठी सोहेलची अटक ही शरमेची बाब मानण्यात येत असून दाऊदच्या साम्राज्याला खिंडार पडत असल्याचेही हे लक्षण मानण्यात येत आहे.