पाकिस्तानमध्ये अज्ञात हल्लेखोरांनी भारताच्या एका शत्रूची हत्या केल्याचे वृत्त आहे. लष्कर-ए-जब्बारचा संस्थापक दाऊद मलिक याची वझिरीस्तानमध्ये भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दाऊद मलिक हा भारतातील मोस्ट वाँटेड जैश-ए-मोहम्मदचा संस्थापक मसूद अझहरचा जवळचा सहकारी असल्याचे म्हटले जात होते. पाकिस्तानी वृत्तपत्र डॉनच्या वृत्तात दाऊद मलिक याच्या मृत्यूची पुष्टी करण्यात आली आहे.
वृत्तानुसार, उत्तर वझिरीस्तानमधील मिराली येथे दाऊद मलिकची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. दरम्यान, दहशतवादाचे धोरण आणि भारतविरोधी हत्यार म्हणून वापर करणाऱ्या पाकिस्तानला हा मोठा झटका बसला आहे. दाऊद मलिकसारख्या दहशतवाद्याच्या अज्ञात हत्येच्या घटनेने पाकिस्तानच्या सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांची झोप उडाली आहे. दुसरीकडे, ज्यांनी दाऊद मलिकची हत्या केली, ते गुन्हा करून पळून जाण्यात यशस्वी झाले.
स्थानिक पोलिसांनी घटनास्थळावरून आणखी एका अज्ञात व्यक्तीचा विकृत मृतदेह जप्त केला आहे. काही रिपोर्टमध्ये असे म्हटले आहे की, दाऊद मलिक एका खाजगी दवाखान्यात असताना हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला. दरम्यान, लष्कर-ए-जब्बारच्या विकासातील दाऊद मलिकची भूमिका आणि दहशतवाद्यांच्या व्यापक नेटवर्कशी असलेले त्याचे संबंध यामुळे त्याची सखोल चौकशी करण्यात येत होती.
मलिक हा भारतविरोधी कारवायांमध्ये सहभागी असलेला १७ वा दहशतवादी असून त्याची गूढपणे हत्या करण्यात आली. दरम्यान, काही दिवसांपूर्वी खलिस्तानी दहशतवादी हरदीप सिंग निज्जर आणि सुखदुल सिंग उर्फ सुखा दुनेके यांची कॅनडात हत्या करण्यात आली होती. गेल्या वर्षी कराचीमध्ये झहूर यांची हत्या झाली होती. त्यापाठोपाठ कॅनडा-आधारित दहशतवादी रिपुदमन सिंग मलिक होता, ज्यावर एअर इंडिया फ्लाइट १८२ वर बॉम्बस्फोट केल्याचा आरोप होता आणि त्याची निर्दोष मुक्तता करण्यात आली. या हल्ल्यात ३०० हून अधिक लोक मारले गेले होते. जुलै २०२२ मध्ये कॅनडामध्ये त्यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती.