आशिष सिंह
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: पाकिस्तानच्या कराची विमानतळावर दाऊद इब्राहीमच्या डी कंपनीने कब्जा मिळवला असून दाऊद, छोटा शकील, त्यांचे नातलग आणि डी कंपनीशी व्यवहार करण्यासाठी आलेल्या व्यक्तींना इमिग्रेशनशिवाय मुक्त प्रवेश दिला जात असल्याची धक्कादायक माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) मिळाली आहे. एव्हढेच नव्हे, तर त्यातील कोणाच्याही पासपोर्टवर शिक्के मारले जात नसल्याचे चौकशीत उघड झाले आहे. त्यामुळे यातील कोणीही कराचीत जाऊन दाऊद किंवा छोटा शकीलला भेटला, त्याच्याशी व्यवहार केले किंवा त्यांच्या कोणत्याही सोहळ्याला हजर राहिला तरी त्याचा कोणताच पुरावा मिळत नसल्याचेही एनआयएला आढळले आहे.
कराची विमानतळावरील अधिकारी त्यात सामील असून जेव्हा यातील कोणी विमानतळावर येतो तेव्हा त्यांना व्हीआयपी लाऊंजमधूनच थेट बाहेर काढले जाते किंवा परत आल्यावर त्याच लाऊंजमध्ये सोडले जाते. बाहेर काढल्यावरही थेट दाऊद किंवा छोटा शकीलच्या घरी किंवा भेटीच्या ठरलेल्या ठिकाणी नेले-आणले जाते. भारत-पाकिस्तान असा प्रवास केल्याचे कुठेही दिसू नये म्हणून भारतातून दुबई किंवा अन्य गल्फ देशांचे प्रवासाचे तिकीट काढले जाते. पाकिस्तानात उतरल्याचा कोणताही पुरावा मिळू नये म्हणून त्यांच्या पासपोर्टवर कोणतेही शिक्के मारले जात नाहीत.
दाऊदशी काम संपल्यावर त्यांना तिकीट काढलेल्या दुबई किंवा अन्य देशांत पाठवून तेथून परतीची व्यवस्था केली जाते, अशी माहिती छोटा शकीलचा सध्या अटकेत असलेला मेहुणा सलिम कुरेशी ऊर्फ सलिम फ्रूटची पत्नी आणि त्यांचे विमान बुकिंग करणाऱ्या मुंबईतील एका ट्रॅव्हल एजन्सीच्या चौकशीतून पुढे आली आहे.
छोटा शकीलची पत्नी नजमा ही सलीम फ्रूटच्या पत्नीची बहीण आहे. त्यामुळे छोटा शकीलची मोठी मुलगी जोया आणि लहान मुलगी अनाम हिच्या साखरपुड्याला आणि नंतर निकाह सोहळ्याला जेव्हा फ्रूटची पत्नी पाकिस्तानात गेली, तेव्हा तपास यंत्रणांना गुंगारा देण्यासाठी तिने याच पद्धतीने प्रवास केल्याचे कबूल केले. अशा प्रकारे ती तीनवेळा अनधिकृतपणे पाकिस्तानात जाऊन आली. त्यातील दोन वेळा सलीम फ्रूटही तिच्यासोबत होता. तो तेव्हा छोटा शकीलला भेटायला गेला होता, याची कबुलीही तिने दिली.
जोयाचा साखरपुडा २०१३ ला झाला, तेव्हा ती आपला मुलगा- मुलगी या दोघांनाही घेऊन कराचीला गेली होती पण तेव्हा दुबईला जाणाऱ्या कनेक्टिंग विमानाची त्यांची तिकिटे काढली होती. ते कराची विमानतळावर पोहोचले तेव्हा छोटा शकीलचा एक हस्तक त्यांना घेण्यासाठी विमानतळावर आला होता तेव्हा कराचीत उतरूनही त्यांच्या पासपोर्टवर शिक्के मारले गेले नाहीत. जोयाच्या साखरपुड्याला छोटा शकील हजर होता, पण निकाह सोहळ्याला मात्र तो नव्हता, असेही तिने सांगितले.
निकाहला जाणे हा गुन्हा नाही: राजगुरू
दाऊद इब्राहीम आणि छोटा शकीलला भारत सरकारने फरार घोषित केले आहे. त्यांच्या कुटुंबीयांना नाही. त्यामुळे सलीम फ्रूटच्या कुटुंबीयांनी छोटा शकीलच्या मुलींच्या निकाह सोहळ्याला जाणे हा गुन्हा नाही, असा दावा त्यांचे वकील विकार राजगुरू यांनी केला आहे. सलीम फ्रूटकडून मिळवलेली माहिती हा ठोस पुरावा नसल्याचा दावाही त्यांनी केला.
जोयाचा निकाह १८ सप्टेंबर २०१४ ला झाला, तेव्हा मुंबई ते कराची आणि कराची ते रियाध अशी तिकीटे काढली गेली. १९ तारखेला सकाळी ७.१० चे विमान पकडून सलीम फ्रूट रियाधला गेला. पण तेवढ्या काळात जवळपास १७ तास तो छोटा शकीलसोबत होता. पण यावेळीही सलीमचे कुटुंबीय त्याच्यासोबत न निघता पाच-सहा दिवसांनी दुबईला गेले आणि तेथून भारतात परतले.
पासपोर्टवर शिक्के न मारताच प्रवास
- छोटा शकीलची धाकटी मुलगी अनामच्या साखरपुड्याला २४ मार्च २०१४ ला जेव्हा सलीम फ्रूट, त्याची पत्नी आणि कुटुंबीय गेले तेव्हा कराचीमार्गे दुबईला जाणाऱ्या विमानाची तिकिटे काढली होती.
- तेव्हाही पासपोर्टवर शिक्के न मारताच त्यांना कराचीत थेट छोटा शकीलच्या घरी नेण्यात आले तेव्हा सलीम फ्रूट जवळपास आठ तास छोटा शकीलसोबत होता आणि रात्री १०.१० च्या विमानाने तो दुबईला गेला.
- मात्र, त्याचे कुटुंबीय आणखी पाच-सहा दिवस छोटा शकीलच्या घरी राहिले. तेथून ते कराचीमार्गे दुबईला गेले आणि तेथून परतले पण कराचीतून दुबईला जाताना त्यांच्या पासपोर्टवर शिक्के मारण्यात आले नाहीत.