लंडन : ब्रिटनच्या आर्थिक निर्बंध यादीत अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहीमचा समावेश असून भारतासाठी मोस्ट वाँटेड असलेल्या दाऊदविरुद्ध आंतरराष्ट्रीय अटक वॉरंटही जारी करण्यात आलेले आहे. तो पाकिस्तानात असल्याचा दावा भारताने अनेकदा पुराव्यानिशी केलेला असला तरी पाकिस्तान मात्र दरवेळी इन्कार करीत आला आहे. तथापि, ब्रिटनच्या या संपत्ती जप्तीच्या यादीतील नोंद म्हणजे दाऊद पाकिस्तानात असल्याचा सज्जड पुरावाच आहे.ब्रिटनच्या वित्तमंत्रालयाने २७ जानेवारी २०१६ रोजी अद्ययावत केलेल्या एकत्रित अद्ययावत यादीत समावेश असलेला दाऊद हा एकमेव भारतीय नागरिक आहे. तसेच यादीत देण्यात आलेले त्याचे चारही ठावठिकाणे पाकिस्तानच्या कराचीतील आहेत.याशिवाय या यादीत लिबरेशन टायगर्स आॅफ तामिळ इलम (लिट्टे), खलिस्तान झिंदाबाद फोर्स, इंटरनॅशनल शीख युथ फेडरेशन आणि हिज्बुल मुजाहिदीन या संघटनेचाही समावेश आहे.यादीतील नोंदीनुसार दाऊद इब्राहीम कासकर, घर क्रमांक ३७, ३० मार्ग, डिफेन्स हाऊसिंग अॅथॉरिटी, कराची, घर क्रमांक २९, मरगल्ला रोड, एफ-६/२, स्ट्रीट नंबर २२, कराची, नूराबाद (पलातियल बंगला)आणि व्हाईट हाऊस, सौदी मशीद नजीक, क्लिफटन, कराची येथे राहतो.मुंबईत जन्मलेल्या दाऊदचा उल्लेख भारतीय असा करण्यात आला आहे. तसेच त्याच्याकडे भारतीय पासपोर्ट असल्याचा उल्लेख करण्यात आलेला आहे. तथापि, भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केलेला आहे. त्याने अनेक भारत आणि पाकिस्तानी पासपोर्ट मिळवून त्याचा दुरुपयोग केला, असा उल्लेखही या यादीत करण्यात आला आहे. दाऊदविरुद्ध भारत सरकारने आंतरराष्ट्रीय अटक वॉरंट जारी केलेले आहे.ब्रिटनचे आर्थिक निर्बंध ब्रिटन किंवा परदेशातील व्यक्ती, संस्था-संघटना आणि सरकारसाठी लागू होऊ शकतात. आर्थिक निर्बंधातहत निर्बंध लागू करण्यात आलेल्या देशांत निधी पाठविण्यावर प्रतिबंध आहे. तसेच संपत्ती गोठविण्याबाबत लक्ष्यित देशांतील संस्था-संघटना आणि व्यक्तीची संपत्ती गोठविण्याचीही यात तरतूद आहे. तसेच काही आर्थिक निर्बंधानुसार विमा यासारख्या आर्थिक सेवा करण्यास किंवा पुरविण्यास मनाई आहे.
ब्रिटनच्या यादीत दाऊदचा समावेश
By admin | Published: February 03, 2016 2:49 AM