नवी दिल्ली - २६ फेब्रुवारीला भारतीय हवाई दलाने एअर स्ट्राइक करून पाकिस्तानच्या बालाकोट येथे असलेला दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त केला होता. या कारवाईत ठार झालेल्या दहशतवाद्यांच्या संख्येवरून भारतात राजकारण रंगले आहे. तर पाकिस्तानही या कारवाईत कुणाचाही मृत्यू झाला नसल्याचा दावा करत आहे. मात्र भारतीय हवाई दलाने केलेल्या या जबरदस्त कारवाईत अनेक दहशतवादी ठार झाले असून, त्यांचे मृतदेह अद्यापही बालाकोट येथेच पडून असल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. दहशतवाद्यांचे मृतदेह घटनास्थळी पडून असल्यानेच पाकिस्तानी सरकार आणि लष्कराकडून प्रसारमाध्यमांना तिथे जाण्याची अनुमती देण्यात येत नसल्याचा दावा करण्यात येत आहे.जम्मू-काश्मीरमधील पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमध्ये घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली. मात्र, पाकिस्तान ही कारवाई जगासमोर येऊ नये म्हणून धडपडत आहे. पाकव्याप्त काश्मीरमध्ये ज्या ठिकाणी भारताने हल्ला केला. त्या ठिकाणी पाकिस्तानचे सुरक्षा अधिकारी मीडियाला जाऊ देत नाही आहेत. त्या ठिकाणी जाण्यास मीडियाला बंदी घालण्यात आली आहे.
न्यूज एजन्सी रॉयटर्सच्या एका टीमला गुरुवारी याचा अनुभव आला.. भारताकडून करण्यात आलेल्या कारवाईत भारतीय हवाई दलाने पाकव्याप्त काश्मीरमधील बालाकोटमधील 'जैश-ए-मोहम्मद' दहशतवादी संघटनेच्या तळांना लक्ष केले होते. याठिकाणी जाण्यास पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी मीडिया टीमला जाण्यास विरोध करण्यात आला.
दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील पुलवामामध्ये 14 फेब्रुवारीला 'जैश-ए-मोहम्मद'च्या दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला होता. त्यात सीआरपीएफचे 40 जवान शहीद झाले होते. या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून दहशतवाद्यांवर मोठी कारवाई केली. या कारवाईत बालाकोट, चकोटी, मुझ्झफराबादमधील 'जैश-ए-मोहम्मद' या दहशतवादी संघटनेच्या तळांवर भारताच्या ‘मिराज 2000’च्या 12 लढाऊ विमानांनी 1000 किलोचे बॉम्ब फेकले होते. यात जवळपास 300 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा झाल्याचे सांगण्यात येते. या कारवाईनंतर भारत- पाकिस्तान दरम्यान तणावाचे वातावरण आहे.