Ramen Roy Chinmoy Krishna Das: राष्ट्रीय ध्वजाचा अवमान केल्याच्या प्रकरणात अटकेत असलेले चिन्मय कृष्णा दास यांच्या वकिलावर हल्ला करण्यात आल्याची घटना घडली आहे. इस्कॉनचे कोलकातातील प्रवक्ते राधारमण दास यांनी या घटनेची माहिती दिली. रामेन रॉय असे चिन्मय कृष्ण दास यांच्या वकिलाचे नाव असून, घरात घुसून जीवघेणा हल्ला करण्यात आला. त्यांची प्रकृती गंभीर आहे.
इस्कॉन कोलकाताचे प्रवक्ते राधारमण दास यांनी दावा केला आहे की, बांगलादेशातील हिंदू संन्यासी चिन्मय कृष्ण दास यांची न्यायालयीन प्रकरणात बाजू मांडणारे वकील रामेन रॉय यांच्यावर क्रूर हल्ला करण्यात आला आहे.
रामेन रॉय यांची एकच चूक होती की, ते चिन्मय रॉय यांची केस लढत होते. कट्टरतावाद्यांनी घरात घुसून त्यांच्यावर हल्ला केला. घरातील सामानाची तोडफोड केली, असे राधारमण दास यांनी म्हटले आहे.
या हल्ल्यात रामेन रॉय गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर आयसीयू अर्थात अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून, त्यांची मृत्यूशी झुंज सुरू आहे, असेही दास यांनी सांगितले.
चिन्मय दास यांना २५ नोव्हेंबरला अटक
बांगलादेशातील हिंदू आध्यात्मिक गुरू चिन्मय कृष्ण दास यांच्यावर देशद्रोहाचा आरोप करण्यात आलेला आहे. त्यांना २५ नोव्हेंबर रोजी अटक करण्यात आली. बांगलादेशाच्या ध्वजापेक्षा वर भगवा ध्वज फडकावल्याचा आरोप करण्यात आलेला आहे. चिन्मय दास यांना अटक केल्यानंतर बांगलादेशात हिंसक घटना सुरू झाल्या.