जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. आतापर्यंत 63 लाखांहून अधिक लोकांचा बळी घेणारा कोरोना हा आजार अद्याप संपलेला नाही. आताही दररोज लाखो कोरोना बाधित आढळून येत आहेत आणि मोठ्या प्रमाणात लोकांचा मृत्यूही होत आहे. याच दरम्यान एका तापाने जागतिक आरोग्य संघटना (WHO) हैराण झाली आहे. नाकातून रक्त येणे हे त्याचं मुख्य लक्षण आहे. यामुळेच या तापाला नोज ब्लीड फीव्हर म्हटलं जात आहे आणि चिंताजनक बाब म्हणजे संसर्ग झालेल्या 10 पैकी 4 जणांचा मृत्यू होतो. म्हणजेच 40 टक्के रुग्णांचा या तापामुळे मृत्यू होत आहे.
क्रिमियन-काँगो हेमोर्रेजिक फिव्हर (CCHF) असं या तापाचं नाव आहे. कोरोना विषाणूप्रमाणेच तोही प्राण्यांकडून माणसांमध्ये आला आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, यावर्षी इराकमध्ये सीसीएचएफमुळे 111 पैकी 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. डब्ल्यूएचओ देखील या तापाबद्दल चिंतित आहे, कारण त्यापासून वाचण्यासाठी अद्याप कोणतीही लस उपलब्ध नाही.
आजाराची लक्षणं
CCHF मुळे शरीराच्या अंतर्गत आणि बाह्य अवयवातून रक्तस्त्राव सुरू होतो, विशेषत: नाकातून रक्त येणे हे या आजाराचे प्रमुख लक्षण आहे. तज्ञांच्या मते यामध्ये 40 टक्के संक्रमित लोकांचा मृत्यू होतो. इराकच्या धी-क्वार प्रोविंसचे आरोग्य अधिकारी हैदर हनटॉसे यांनी येथे CCHF च्या प्रकरणांमध्ये अभूतपूर्व वाढ झाली आहे असं म्हटलं आहे.
इराकमधील अर्ध्याहून अधिक CCHF प्रकरणे दक्षिण इराकच्या या गरीब भागात आढळून आली आहेत, जिथे बहुतेक लोक शेती करतात. ते म्हणाले, गतवर्षी मोजकीच प्रकरणे नोंदवली गेली होती, मात्र यावर्षी जास्त प्रकरणे आहेत. हा ताप टिक्स (कीटक) द्वारे पसरतो. CCHF विषाणू म्हैस. गाय, शेळी, मेंढी इत्यादी पाळीव आणि वन्य प्राण्यांमध्ये आढळतो. यावर कोणतेही उपचार उपलब्ध नसल्याने WHO चं टेन्शन वाढलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.