President Volodymyr Zelensky Missile Attack Russia Ukraine War: रशिया आणि युक्रेन यांच्यातील युद्ध अद्यापही थांबलेले नाही. दोन्ही देशांचे राष्ट्राध्यक्ष अतिशय आक्रमक पद्धतीने बाबी हाताळताना दिसत आहेत. तशातच ताज्या मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्लोदिमीर झेलेन्स्की हे मिसाईल हल्ल्यातून थोडक्यात बचावल्याचे सांगितले जात आहे. झेलेन्स्की यांच्या ताफ्याच्या अगदी जवळ सुमारे ५०० अंतरावर रशियाने सोडलेले एक मिसाईल पडल्याचे सांगण्यात येत आहे. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की हे ग्रीसचे राष्ट्राध्यक्ष व शिष्टमंडळ यांच्यासोबत असताना हा प्रकार घडला. रशिया-युक्रेन युद्ध सुरू झाल्यानंतर पहिल्यांदाच झेलेन्स्कीच्या इतक्या जवळ क्षेपणास्त्र हल्ला झाला आहे.
थोडक्यात बचावले राष्ट्राध्यक्ष
गेल्या महिन्यातच रशिया-युक्रेन युद्धाला दोन वर्षे पूर्ण झाली. अनेक प्रयत्न करूनही दोन्ही देशांमध्ये शांतता प्रस्थापित झालेली नाही. दर काही दिवसांनी ड्रोन हल्ले आणि क्षेपणास्त्र हल्ल्यांच्या बातम्या सतत येत आहेत. त्यातच मिळालेल्या माहितीनुसार, युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष आणि ग्रीसचे पंतप्रधान ओडेसामध्ये भेटणार होते. पण जेव्हा राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा ताफा ग्रीक दूतावासात पोहोचला तेव्हा जवळपास ५०० मीटर अंतरावर क्षेपणास्त्र हल्ला झाला.
युरोपीयन जनतेचा युक्रेनला पाठिंबा पण...
दरम्यान, युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सने केलेल्या सर्वेक्षणात या युद्धासंदर्भात एक अतिशय मनोरंजक गोष्ट समोर आली आहे. युरोपियन कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्सच्या सर्वेक्षणानुसार, युरोपमधील बहुतेक लोक रशिया विरुद्धच्या युद्धात युक्रेनला पाठिंबा देताना दिसत आहेत. पण असे असले तरी एका सर्व्हेनुसार, केवळ १० टक्के लोकांनाच युक्रेन युद्ध जिंकू शकेल असा विश्वास आहे, तर बहुतेक लोकांचा असा विश्वास आहे की हे युद्ध केवळ करारानेच संपुष्टात येऊ शकते.