कराची : पाकिस्तानात विषारी दारूमुळे २४ हिंदू नागरिक मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये सहा महिलांचा समावेश आहे. या सर्वांनी होळीनिमित्त मद्यप्राशन केले होते. सिंध प्रांताच्या तांडो मोहंमद खान जिल्ह्यात सोमवारी रात्री ही दुर्घटना घडली. विषारी दारू प्यायल्यानंतर ३५ जणांची प्रकृती बिघडली. त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले असता, सहा महिलांसह २४ जणांचा मृत्यू झाला. उर्वरितांवर उपचार सुरू आहेत. या सर्वांनी होळी साजरी करण्यासाठी एका ठोक विक्रेत्याकडून स्वस्त दारूची खरेदी केली होती, असे हैदराबादेतील वरिष्ठ पोलीस अधिकारी हक नवाज यांनी सांगितले.उर्वरित नऊ जणांचीही प्रकृती गंभीर असल्याचेही ते म्हणाले. रहिवाशांनी पोलीस प्रशासनाविरुद्ध जोरदार निदर्शने केली. आपल्या वसाहतीतील बेकायदा दारूविक्रीला आळा घालण्यात पोलीस अयशस्वी ठरल्याचा आरोप त्यांनी केला. या प्रकरणी दोन जणांना अटक झाली असून, एका अधिकाऱ्याला निलंबित करण्यात आले आहे. २०१४ मध्ये ईद उल अझा सणादरम्यान अशीच दुर्घटना हैदराबाद आणि कराचीत घडून २९ लोकांचा बळी गेला होता.
विषारी दारूमुळे २४ हिंदूंचा मृत्यू
By admin | Published: March 23, 2016 4:16 AM