टेक्सास - अमेरिकेतील टेक्सासमधील बाप्टिस्ट चर्चमध्ये एका व्यक्तीनं केलेल्या अंदाधुंद गोळीबारात 27 जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये दोन वर्षाच्या लहान मुलाचाही समावेश आहे. या हल्ल्यात 22 जण गंभीर जखमी झाले असून त्यांना असून त्यांना जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, हल्लेखोरही ठार झाला असून त्याला पोलिसांनी मारले की त्याने स्वत:च गोळी झाडून घेतली याबाबत नेमकी माहिती हाती आलेली नाही. एबीसीच्या वृत्तानुसार, पोलिसांनी त्या हल्लेखोराला मारले आहे. हा हल्ला स्थानिक वेळेनुसार, रविवारी सकाळी 11:30 वाजाता झाल्याचे प्रत्यक्षदर्शी सांगत आहेत. स्थानिक वृत्तानुसार, सकाळी चर्चमध्ये प्रार्थना करण्यासाठी लोक जमले होते त्यावेळी हल्लेखोरानं गोळीबार केला.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विटरवरुन या हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. एफबीआय तेथे उपस्थित असून कायद्याची अंमलबजावणी सुरू आहे. ट्रम्प सध्या जपान दौऱ्यावर असून तिथूनच ते संपूर्ण स्थितीवर लक्ष ठेऊन आहेत.
हल्लेखोराचे नाव डेविन केले (26) असे सांगण्यात येत आहे. टेक्सासमधील न्यू ब्रॉनफेल्स भागातील रहिवाशी असलेला डेविन स्थानिक वेळेनुसार साडेअकराच्या सुमारास चर्चमध्ये घुसला आणि त्याने बेछूट गोळीबार सुरू केला. टेक्सासचे गव्हर्नर ग्रेग अॅबॉट यांनी या घटनेबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केलं आहे. घटनेबाबत अधिक माहिती लवकरच दिली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान दोन नोव्हेंबर रोजी अमेरिकेतील कोलोरॅडो येथील डेन्व्हर उपनगरातील एका वॉलमार्टमध्ये अज्ञाताकडून गोळीबारात करण्यात आला होता. या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला. कोलोरॅडो येथील डेन्व्हर उपनगरापासून उत्तरपूर्व भागात असलेल्या या वॉलमार्टमध्ये हा गोळीबार करण्यात आला. याचबरोबर 1 नोव्हेंबराला न्यूयॉर्कमधील मॅनहॅटन शहरात एका ट्रक चालकाने पादचा-यांना चिरडल्याने एकच खळबळ उडाली. या दुर्घटनेत आठ जणांचा मृत्यू झाला, तर 12 जण जखमी झाले होते.