इस्रायलकडून गाझामध्ये जबरदस्त हवाई हल्ले सुरू आहेत. यात सर्वसामान्यांच्या मृत्यूचा आकडाही वाढत चालला आहे. मंगळवारी (24 ऑक्टोबर) इस्रायलच्या हवाई हल्ल्यात अल जझीराचा रिपोर्टर वाएल अल-दहदौह यांचे संपूर्ण कुटुंब मारले गेले आहे. यानंतर वाएल अल-दहदौह यांना मोठा धक्का बसला आहे. त्यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातवाचा मृत्यू झाला आहे.
यापूर्वी, इस्रायली लष्कराने गाझाचा उत्तरी भाग रिकामा करण्याचा इशारा तेथील नागरिकांना दिला होता. तेव्हापासून, अल जझीराचे ब्युरो चीफ वाएल अल-दहदौह आपल्या कुटुंबासह तेथून मध्य गाझातील नुसिरत कॅम्पमध्ये आले होते. येथील छावणीतच त्यांचे कुटुंब राहत होते.
संपूर्ण कुटुंब नष्ट -मंगळवारी रात्री उशिरा अचानक झालेल्या हवाई हल्ल्यात अल-दहदौह यांची पत्नी, मुलगा, मुलगी आणि नातू मारले गोले. द गार्डियनने दिलेल्या वृत्तानुसार, अल-दहदौह यांच्या कुटुंबातील इतर सदस्य ढिगाऱ्याखाली गाडले गेले. अल जझीराच्या क्लिपमध्ये अल-दहदौह देखील रडताना दिसत आहे. देर अल-बालाह येथील अल-अक्सा शहीद रुग्णालयाच्या शवागारात त्याच्या कुटुंबीयांचे मृतदेह पाहिल्यानंतर त्यांना रडू कोसळले.
अशा प्रकारच्या हल्ल्याची शक्यता होती -रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर, अल जझीरासोबत बोलताना अल-दहदौह म्हणाले, “जे घडले ते स्पष्ट आहे. ही मुले, महिला आणि नागरिकांवरील लक्ष्यित हल्ल्यांची मालिका आहे. मी अशाच एका हल्ल्यासंदर्भात यरमौकमध्ये रिपोर्टिंग करत होतो. त्याच वेळी इस्त्रायली सैन्याने नुसिरातसह अनेक भागांना लक्ष्य केले. इस्रायली सैन्य या लोकांना शिक्षा केल्याशिवाय सोडणार नाही, असे मला वाटतच होते आणि तसेच घडले." याच वेळी अल जजीरानेही या घटनेची निंदा केली आहे.