ऑनलाइन टीम
गाझा/जेरुसलेम, दि. २७- गाझापट्टीत १२ तासांची शस्त्रसंधी संपल्यावर इस्त्रायलने रविवारी पुन्हा एकदा गाझा पट्टीवर हल्ला केला. पॅलेस्टाइनच्या हमासने दिलेल्या प्रत्युत्तरात भारतीय वंशांच्या इस्त्रायल सैनिकाचा मृत्यू झाला. बराक राफेल देगोरकर असे या जवानाचे नाव असून तो २७ वर्षांचा होता.
इस्त्रायल आणि पॅलेस्टाइनच्या हमासमधील संघर्ष काही काळ थांबवण्याची विनंती संयुक्त राष्ट्राने केली होती. यानुसार इस्त्रायल व हमासने १२ तासांसाठी शस्त्रसंधी केली होती. रविवारी सकाळी शस्त्रसंधी संपताच इस्त्रायलने पुन्हा एकदा गाझा पट्टीत हल्ला सुरु केला. गाझा पट्टीतील सीमा रेषेजवळ झालेल्या गोळीबारात इस्त्रायल सैन्यातील भारतीय वंशांचा जवान देगोरकरचा मृत्यू झाला. गान यावने येथील संघर्षात देगोरकर गंभीर जखमी झाला व उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला असे इस्त्रायल सैन्यातील अधिका-यांनी सांगितले. डेगोरकर हा बेने इस्त्रायल समुदायाचा असून त्याचे कुटुंबीय पूर्वी मुंबईत राहत होते. बेने इस्त्रायल हा इस्त्रायलमधील भारतीय वंशांच्या नागरिकांचा सर्वात मोठा समूदाय असून यात सुमारे ५० हजार जणांचा समावेश आहे. यातील बहुसंख्य तरुण सध्या गाझा संघर्षात इस्त्रायलसाठी लढा देत आहेत. देगोरकर हा आनंदी स्वभावाचा तरुण होता अशी आठवण त्याच्या सहका-यांनी सांगितली.