पॅरिस : गेल्या शनिवारी पॅरिसवर झालेल्या हल्ल्यातील मास्टर माइंड अब्देल हमीद अबाऊद बुधवारी पोलीस कारवाईत मारला गेल्याचे फ्रान्स सरकारने गुरुवारी जाहीर केले.पॅरिसच्या प्रॉसिक्युटरनी ही घोषणा करताना सांगितले की, त्याच्या मृतदेहाची ओळख पटली असून, त्याचा खात्मा झाला आहे. २७ वर्षीय अबाऊदच्या मृत्यूची घोषणा करताना प्रॉसिक्युटर मॉलिन्स म्हणाले की, त्वचेच्या सॅम्पलवरून त्याची ओळख पटू शकली. पोलिसांनी छापा मारलेल्या इमारतीवरच त्याचा मृतदेह सापडला. अमेरिकेच्या एफबीआयने दिलेल्या इशाऱ्यानंतर इटलीत पोलीस पाच संशयितांचा शोध घेत आहेत. हे पाच जण इटलीत महत्त्वाच्या ठिकाणी हल्ले करण्याची शक्यता एफबीआयने वर्तविली होती. त्यानुसार हा शोध सुरू असल्याचे इटलीचे परराष्ट्रमंत्री पावले जेन्तिलोनी यांनी सांगितले.रोममध्ये सेंट पीटर्स बॅसिल्का, मिलान येथील चर्च आणि ला स्काला आॅपेरा हाऊस तसेच अन्य काही ठिकाणी हल्ले केले जाण्याची शक्यता अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने वर्तविली होती. दरम्यान, डॅनिश आणि नॉर्वेच्या अधिकाऱ्यांनी स्वीडनच्या अधिकाऱ्यांना एका ‘संशयास्पद’ इसमाचा शोध घेण्यास सांगितले आहे. या इसमाचा पॅरिस हल्ल्याशी संबंध नसला तरीही तो दहशतवादी हल्ल्याची तयारी करीत होता, अशी माहिती मिळाल्यानंतर स्वीडनला ही विनंती करण्यात आली आहे.
पोलीस कारवाईत मास्टर माइंडचा खात्मा
By admin | Published: November 20, 2015 3:55 AM