ऑनलाइन लोकमत
रियाध, दि. 19 - एका व्यक्तीच्या हत्येप्रकरणी सौदी अरेबियाच्या राजघराण्यातील सदस्य असलेल्या राजपुत्र तुर्की बिन सौद अल कबीर याला मंगळवारी मृत्युदंड देण्यात आला. राजपुत्र अल कबीर हा 2016 मध्ये सौदी अरेबियात मृत्युदंड देण्यात आलेली 134 वी व्यक्ती ठरला आहे.
राजपुत्र अल कबीर याला मंगळवारी राजधानी रियाध येथे मृत्युदंडाची शिक्षा देण्यात आली अशी माहिती सौदी अरेबियाच्या गृहमंत्रालयाकडून देण्यात आली आहे. अल कबीर याच्यावर सौदी नागरिक आदिल अल मोहम्मद याला गोळ्या घालून ठार केल्याचा आरोप ठेवण्यात आला होता.
आपल्या मित्राची हत्या केल्याप्रकरणी सौदीच्या एका राजपुत्राला रियाधमधील एका न्यायालयाने मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्याचे वृत्त 2014 साली अरब न्यूजने दिले होते. 2012 साली सौदीच्या राजपुत्राकडून हा गुन्हा घडला होता. मात्र गोळीबाराला बळी पडलेले आपले मित्र आणि सहकारी असल्याचे कळल्यावर राजपुत्राने याबाबतची खबर पोलिसांना दिली होती.
दरम्यान, राजपुत्राला देण्यात आलेली मृत्युदंडाची शिक्षा हे सौदीच्या सर्वांना समान न्याय देण्याच्या व्यवस्थेचे प्रतीक असल्याचे राजपुत्राच्या गोळीबारात ठार झालेल्या व्यक्तीचे नातेवाईक अब्दुल रहमान अल फलाज यांनी म्हटले आहे. सौदी अरेबियात कडक इस्लामी कायदा लागू असून, या कायद्यानुसार खून, अमली पदार्थांची तस्करी, सशस्र दरोडा, बलात्कार आणि धर्मत्याग करणाऱ्या व्यक्तींना मृत्युदंडाची शिक्षा सुनावली जाते.