वॉशिंग्टन - अमेरिकेमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा झालेला पहिला भारतीय वंशाचा नागरिक असलेल्या व्यक्तीला 23 फेब्रुवारी रोजी मृत्युदंड देण्यात येणार आहे. एक महिला आणि तिच्या नातीची हत्या केल्याप्रकरणी या व्यक्तीला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती.रघुनंदन यांदामुरी असे मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या भारतीय वंशाच्या नागरिकाचे नाव आहे. त्याने 61 वर्षीय भारतीय महिलेचे आणि तिच्या दहा महिन्यांच्या नातीचे अपहरण करून त्यांची हत्या केली होती. या प्रकरणी न्यायालयात खटला चालून 2014 साली त्याला मृत्युदंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. आता 23 फेब्रुवारीला विषारी इंजेक्शन देऊन त्याला मृत्युदंड देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मात्र पेनसिल्व्हेनियाच्या गव्हर्नरनी 2015 साली कायद्यातून मृत्युदंडाची शिक्षा रद्द करण्याचा निर्णय दिलेला असल्याने रघुनंदन याला सुनावण्यात आलेल्या मृत्युदंडाच्या शिक्षेची अंमलबजावणी रद्द होऊ शकते, अशी शक्यताही वर्तवण्यात येत आहे.टाइम्स हेराल्ड या स्थानिक वर्तमानपत्राने दिलेल्या माहितीनुसार यांदमुरी याला मृत्युदंड देण्यासाठी 23 फेब्रुवारीची तारीख निश्चित करण्यात आलेली असली तरी गव्हर्नर टॉम वुल्फ यांनी मृत्युदंडाची शिक्षा रद्द केलेली असल्याने त्याला सुनावण्यात आलेल्या शिक्षेमध्ये बदल होऊ शकतो. मूळचा आंध्र प्रदेशमधील असलेला यांदमुरी हा एच-1बी व्हिसा घेऊन अमेरिकेत आला होता. त्याने इलेक्ट्रिकल आणि कॉम्प्युटर सायन्स या विषयात पदवी घेतलेली होती. मात्र खुनाच्या गुन्ह्यात अडकल्यानंतर त्याची रवानगी कारागृहात झाली होती. मृत्युदंडाची शिक्षा सुनावल्यानंतर त्याने या शिक्षेविरोधात दाद मागितली होती. मात्र त्याने केलेले अपील गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात फेटाळून लावण्यात आले होते.
अमेरिकेत मृत्युदंडाची शिक्षा सुनावलेल्या पहिल्या भारतीय वंशाच्या आरोपीला 23 फेब्रुवारीला देणार मृत्युदंड
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2018 10:11 PM