ऑनलाइन लोकमत
कोलंबो, दि. ३० - तामिळनाडूतील पाच मच्छिमारांसह आठ जणांना श्रीलंकेतील कोलंबो हायकोर्टाने मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. या आठ जणांना अंमलीपदार्थाची तस्करी केल्याप्रकरणी श्रीलंकेच्या नौदलाने अटक केली होती. या निर्णयाला श्रीलंकेतील सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ असे स्पष्टीकरण भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिले आहे.
२०११ मध्ये श्रीलंकेच्या नौदलाने पाच भारतीय मच्छिमार आणि तीन श्रीलंकेच्या मच्छिमारांना अटक केली होती. या सर्वांवर अंमलीपदार्थांची तस्करी केल्याचा आरोप नौदलाने केला होता. त्यांच्याकडून हिरोईन हे अंमली पदार्थ जप्त केल्याचा दावाही नौदलाने केला होता. याप्रकरणी गुरुवारी कोलंबोतील हायकोर्टाने निकाल दिला. कोर्टाने या आठही दोषींना मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावली आहे. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. 'भारतीय मच्छिमार निर्दोष असतील असे आम्हाला वाटत आहे. या निर्णयाला आम्ही श्रीलंकेतील सुप्रीम कोर्टात आव्हान देऊ तसेच त्या मच्छिमारांना कायदेशीर मदत मिळवून देण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी दिली.