इस्राइलवर हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या हल्लानंतर आता या हल्ल्यावेळी हमासच्या दहशतवाद्यांनी केलेल्या क्रूर कृत्यांची माहिती समोर येत आहे. गाझा जवळ असलेल्या किबुत्ज रीमजवळ नेचर पार्टीमध्ये इस्राइलमधील हजारो तरुण सहभागी झाले होते. हमासच्या दहशतवाद्यांनी त्यांनाच आपलं पहिलं लक्ष्य बनवलं. गेल्या पाच दशकांमध्ये इस्राइलवर झालेला हा सर्वात भीषण हल्ला ठरला. दरम्यान, येथील घटनास्थळावरून २६० मृतदेह सापडल्याची माहिती समोर आली आहे.
अरिक नानी शुक्रवारी रात्री वाढदिवस साजरा करण्यासाठी दक्षिण इस्राइलमधील एका डान्स पार्टीमध्ये गेले होते. मात्र त्यांना हमासच्या हल्ल्यानंतर सुरू झालेल्या नरसंहारामुळे घटनास्थळावरून पळावे लागले. हमासने केलेल्या हल्ल्यावेळी घटनास्थळी असलेल्या एका व्यक्तीने सांगितले की, मला प्रत्येक दिशेने गोळ्यांचा आवाज ऐकू येत होता. ते आमच्यावर दोन्ही बाजूंनी गोळीबार करत होते. प्रत्येक जण पळत होता. तसेच काय करावं हे कुणालाच कळत नव्हतं. तिथे पूर्णपणे अराजकता निर्माण झाली होती. रॉकेटची आग चहुबाजूंना पसरली. पार्टीमध्ये सहभागी झालेल्या लोकांनी तिथून कसाबसा पळ काढण्याचा प्रयत्न केला.
गाझाच्या जवळ असलेल्या भागांवर हमासने केलेल्या या हल्ल्यात सुमारे ७०० इस्राइली नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो लोकांचं अपहरण करण्यात आलं. या घटनेमुळे इस्राइलला मोठा धक्का बसला आहे. इस्राइली प्रसारमाध्यमांनी सांगितले की, नेचर पार्टीमधून आपातकालीन सेवांनी २६० मृतदेह गोळा केले आहेत. इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी जबरदस्त प्रत्युत्तर देण्याचा पण केला आहे. इस्राइली जेट विमानांकडून गाझावर सातत्याने बॉम्बफेक केली जात आहे, त्यात ४०० हून अधिक पॅलेस्टिनी मारले गेले आहेत.