Maldives Mohamed Muizzu, Death threat: मालदीवचेराष्ट्राध्यक्ष मोहम्मद मुइज्जू यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आले आहे. फेसबुकवर एका व्यक्तीने जीवे मारण्याची धमकी दिली. मालदीव पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास सुरू केला आहे. लवकरच कारवाई करणार असल्याचे पोलिसांनी सांगिकले. अबलोर म्याद योसेफ ( Ablor Myad Yosef ) असे धमकी देणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. त्यांने स्थानिक भाषेत फेसबुकवर धमकी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्राध्यक्षांना धमकी देण्यात आल्याची माहिती त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळाली. यानंतर त्यांनी २-३ सोशल मीडिया हँडलवर नजर ठेवली आहे. लवकरात लवकर कारवाई करण्यात येणार असून ते अलर्ट आहेत, असे सहाय्यक पोलिस आयुक्त अहमद शिफान यांनी सांगितले.
माजी राष्ट्रपती अब्दुल्ला यामीन यांना भ्रष्टाचाराच्या गंभीर आरोपाखाली तुरुंगात टाकल्यानंतर मोहम्मद मुइज्जू राष्ट्राध्यक्ष झाले. यामीनचा उत्तराधिकारी म्हणून त्यांची निवड करण्यात आली. यामीन निवडणूक लढवण्यास अपात्र ठरले होते. त्यानंतर मुइज्जू यांनी २०२३च्या अध्यक्षीय निवडणुकीत भारताचे समर्थन असलेल्या इब्राहिम सोलिह यांचा पराभव केला होता. राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक जिंकण्यापूर्वी मुइज्जू हे मालेचे महापौर होते. भारतविरोधी इंडियन आऊट मोहिमेत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.
मुइज्जूला चीनचे समर्थक मानले जाते. त्यांनी लंडन विद्यापीठातून स्ट्रक्चरल इंजिनिअरिंगमध्ये पदवी आणि पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. १९९८ मध्ये त्यांनी बांधकाम आणि सार्वजनिक बांधकाम मंत्रालयातही काम केले. मोहम्मद मुइज्जू यांनी शपथ घेतल्यानंतर भारत आणि मालदीव यांच्यातील संबंध बिघडले. तथापि, संबंध सुधारण्यासाठी द्विपक्षीय चर्चा अनेक स्तरांवर झाल्या. या वर्षी ऑगस्टमध्ये परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर मालदीवमध्ये पोहोचले होते. राष्ट्राध्यक्ष मुइज्जू यांच्यासह त्यांनी तेथील सर्वोच्च नेतृत्वाची भेट घेतली होती. त्यानंतर मालदीवकडूनही संबंध सुधारण्याचे प्रयत्न जोरात सुरू आहेत. याचदरम्यान मुइज्जू यांना धमकी मिळाल्याने अनेक चर्चा रंगल्या आहेत.