ब्राझील (Brazil) मध्ये एका डोंगराचा मोठा भाग सरोवरात पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यावेळी काही लोक बोटींमध्ये सरोवरात एन्जॉय करत होते. त्यांच्यावरच डोंगराचा मोठा भाग आदळला. या घटनेट दहा लोकांचा मृत्यू झाला आहे. काही लोक सरोवरात सुट्टी एन्जॉय करत असताना भूस्खलन झालं. ही घटना एका पर्यटकाने कॅमेरात कैद केली. हा व्हिडीओ पाहिल्यानंतर अंगावर शहारे आल्याशिवाय राहत नाही. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
मिनस गेरॅस स्टेट फायर डिपार्टमेंटचे कमांडर एडगार्ड एस्टेवोने मीडियासोबत बोलताना सांगितलं की, 'या घटनेत सहा लोकांचा जीव गेला आणि कमीत कमी २० लोक बेपत्ता झाले होते. ज्यातील काही लोकांना उपचारानंतर घरी सोडण्यात आलंय. लेक फर्नासमध्ये बोटींमध्ये सफारी करण्याचा आनंद घेण्यासाठी मोठी गर्दी झाली होती.
अनेक लोक बोटींमध्ये बसून आनंद घेत होते, तेव्हा ही मोठी दुर्घटना घडली. ही घटना कॅमेरात कैद करणारी महिला सतत ओरडत होती आणि डोंगराच्या जवळ असलेल्या लोकांना लवकरात लवकर दूर जाण्याचं सांगत होती. त्यातील काही लोकांनी ऐकलं, पण काही लोकांना महिलेचा आवाज जात नव्हता.
व्हिडीओत स्पष्ट दिसत आहे की, मोठ्या डोंगराचे काही तुकडे सरोवरात पडतात. हे बघून दूर असलेल्या काही लोकांनी बोटींवर असलेल्या लोकांना सावधान करण्याचा प्रयत्न केला. पण काहीच वेळात डोंगराचा एक मोठा भाग सरोवरात पडतो. त्यावेळी तीन बोटी तिथेच होत्या. त्यानंतर बचावकार्य करणारे जवान तिथे आले आणि त्यांनी मदतकार्य केलं. जखमी झालेल्या लोकांना वाचवण्यात आलं. अजूनही काही लोक बेपत्ता आहेत.