वॉशिंग्टन : ल्युसियानाचे भारतीय वंशाचे अमेरिकी गव्हर्नर बॉबी जिंदाल यांच्या पोर्ट्रेटवरून वांशिक वाद निर्माण झाला आहे. राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत नशीब अजमावण्याच्या तयारीत असलेल्या जिंदाल यांना पोर्ट्रेटमध्ये त्यांच्या मूळ वर्णाऐवजी गौरवर्णीय व्यक्तीच्या रूपात चितारण्यात आले आहे. जिंदाल यांचे हे पोर्ट्रेट २००८ पासून जिंदाल यांच्या कॅपिटॉल हिल येथील कार्यालयामध्ये लावलेले आहे. ल्युसियानाचे चित्रकार टॉमी योव्ह ज्यु. यांनी जिंदाल यांच्या एका छायाचित्रावरून हे पोर्ट्रेट बनवले होते. ब्लॉगर लमार व्हाईट याने गेल्या आठवड्यात या पोर्ट्रेटचे छायाचित्र टष्ट्वीट केले होते. त्यानंतर ते सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केले गेले. जिंदाल यांचे हे अधिकृत पोर्ट्रेट असल्याचा दावाही व्हाईटने केला होता. जिंदाल यांचे प्रमुख सहकारी काईल प्लोटकिन यांनी ब्लॉगर व्हाईट यांच्यावर वांशिक छळाचा आरोप केल्यानंतर हा मुद्दा चर्चेत आला. प्लोटकिन यांनी जिंदाल यांच्या पोर्ट्रेटबाबत टिपणी करताना व्हाईटविरुद्ध टष्ट्वीट केले. गव्हर्नर यांच्या पोर्ट्रेटचे छायाचित्र टष्ट्वीट करण्याची आवश्यकताच नाही. पोर्ट्रेटमध्ये जिंदाल यांचा मूळ वर्ण दिसत नाही, असे म्हणणे हा वांशिक छळच आहे, असे प्लोटकिन म्हणाले. जिंदाल यांना आपण कधीही भेटलेलो नाही. जिंदाल यांच्या वर्णाबाबत काहीही माहिती नसताना आपण हे पोर्ट्रेट तयार केले होते, असे योव्ह म्हणाले. हे पोर्ट्रेट २००८ पासून ल्युसियाना कॅपिटॉल कार्यालयात असताना यावर वादंग कशामुळे केला जातोय, असा सवाल एका स्थानिक दैनिकाने केला आहे. (वृत्तसंस्था)