नवी दिल्ली: जैश-ए-मोहम्मदचा म्होरक्या मसूद अजहरचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत केला जाण्याची शक्यता आहे. चीननं नरमाईची भूमिका घेतल्यानं संयुक्त राष्ट्राकडून अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित केलं जाऊ शकतं. अजहरला जागतिक दहशतवादी घोषित करण्याच्या प्रयत्नांमध्ये चीननं वारंवार खोडा घातला. मात्र आता अजहर प्रकरणात अडथळा आणला जाणार नसल्याचे संकेत चीनकडून देण्यात आले आहेत. त्यामुळे आज या विषयावर मोठा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. मसूद अजहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याचा प्रस्ताव संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत अनेकदा मतदानासाठी आला. मात्र चीननं प्रत्येकवेळी नकाराधिकाराचा वापर करुन भारताच्या प्रयत्नांना सुरुंग लावला. चीननं वारंवार तांत्रिक मुद्दे उपस्थित करत भारताच्या प्रयत्नांवर पाणी फेरलं. मात्र आता चीननं नरमाईचं धोरण स्वीकारल्यानं अजहरबद्दल मोठा निर्णय घेतला जाऊ शकतो. आज हा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. अजहरचा समावेश आंतरराष्ट्रीय दहशतवाद्यांच्या यादीत झाल्यास ते भारतासाठी मोठं यश ठरेल.फेब्रुवारी महिन्यात पुलवामात झालेल्या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मदनं स्वीकारली. यानंतर अमेरिका, फ्रान्स आणि ब्रिटननं चीनवर दबाव आणला. अजहरबद्दल ठोस भूमिका घेण्यासाठी चीनवर दडपण आणण्यात आलं. काही आठवड्यांपासून हे देश चीनचं मन वळवण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर काल चीननं काहीशी नरमाईची भूमिका घेतली. याविषयी विचार-विमर्श सुरू असून त्यात थोडी प्रगती झाल्याचं चीनकडून सांगण्यात आलं. हे प्रकरण बुधवापर्यंत सुटेल का, असा प्रश्न परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गेंग शुआंग यांना विचारण्यात आला. त्यावर योग्य पद्धतीनं हा प्रश्न सुटेल असा विश्वास वाटत असल्याचं उत्तर शुआंग यांनी दिलं.
मसूद अजहर आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित होणार? भारताच्या प्रयत्नांना मोठं यश मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: May 01, 2019 11:46 AM