ऑनलाइन लोकमत
इस्लामाबाद, दि. 10 - भारतीय नागरिक कुलभूषण जाधव यांना गुप्तहेर ठरवून पाकिस्तानने सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेस काल आंतरराष्ट्रीय न्यायालयाने स्थगिती दिली होती. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या या निर्णयामुळे पाकिस्तानी मीडियाची बोलती बंद झाली आहे. पाकिस्तानी सरकारकडून या निर्णयाबाबत अधिकृत प्रतिक्रियाही अद्याप आलेली नाही. तर भारताविरोधात दररोज गरळ ओकणाऱ्या पाकिस्तानी प्रसारमाध्यमांचीही दातखिळ बसली आहे.
पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये कुलभूषण जाधव यांच्या फाशीच्या शिक्षेस आंतरराष्ट्रीय न्यायालयाकडून देण्यात आलेल्या स्थगितीचा उल्लेख करण्यात आलेला. नाही. पाकिस्तान आंतरराष्ट्रीय न्यायालयाच्या कार्यकक्षेत पाकिस्तान येत नाही. आंतरराष्ट्रीय न्यायालय दोन्ही बाजूंकडच्या सहमतीनेच एखाद्या प्रकरणाची दखल घेऊ शकते, असे जियो टीव्हीने म्हटले आहे. तर डॉन वृत्तपत्राच्या ऑनलाइन आवृत्तीनेही आदेशाबाबत भारताने केलेल्या दाव्याबाबत वृत्त देणे टाळले आहे. एक्स्प्रेस ट्रिब्युननेही कुलभूषण जाधव प्रकरणी वृत्त देणे टाळले आहे.
हेरगिरी व विघातक कृत्ये केल्याचा आरोप ठेवून बलुचिस्तानमध्ये अटक केलेल्या आणि पाकिस्तानच्या लष्करी न्यायालयाने फाशीची शिक्षा ठोठावलेल्या कुलभूषण सुधीर जाधव यांच्या शिक्षेला नेदरलँडमधील हेग येथील आंतरराष्ट्रीय न्यायालयाने (इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस) काल स्थगिती दिली होती. हा निर्णय म्हणजे भारताच्या मुत्सद्देगिरीचा हा मोठा विजय असून, आता कुलभूषण यांच्या सुटकेसाठी पाकिस्तानवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढल्याचे मानले जात आहे.
‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस’ने यासंदर्भात एक पत्र पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनाही पाठविले आहे. विशेष म्हणजे भारताने यासंदर्भात संयुक्त राष्ट्रसंघाचे दार ठोठावले होते. त्यानंतर ‘इंटरनॅशनल कोर्ट ऑफ जस्टीस’ या संयुक्त राष्ट्रसंघाच्या न्यायालयाने कुलभूषण यांच्या फाशीला स्थगिती दिली आहे. व्हिएन्ना कराराचा पाकिस्तानने भंग केल्याचे भारताने म्हटले होते; तसेच फाशीला स्थगिती देण्याची मागणी केली होती.