मेलबर्न : सरोगेट पद्धतीने भारतात जन्मलेल्या दोन मुलांपैकी एक मूल भारतातच सोडण्याचा निर्णय आॅस्ट्रेलियन दाम्पत्याने घेतला असून, हा निर्णय बाळाच्या लिंगावर आधारित असल्याचे वृत्त आहे. भारतातील आॅस्ट्रेलियन दूतावासातील अधिकारी जुळ्या मुलांना घरी घेऊन जाण्यासाठी आग्रह करत असतानाही हे दाम्पत्य आपल्या निर्णयावर ठाम आहे. आॅस्ट्रेलियातील कौटुंबिक न्यायालयाच्या प्रमुख न्यायाधीश डायना ब्रायंट यांनी दिलेल्या माहितीनुसार हा निर्णय बाळाच्या लिंगावर आधारित असल्याचे नवी दिल्ली येथील आॅस्ट्रेलियन उच्चायुक्तालयाने सांगितले. एबीसी व परदेशी प्रतिनिधी यांनी २०१२ चे हे प्रकरण उघडकीस आणले असून, दाम्पत्याने जुळ्या मुलातील एकच मूल घेतले व एक मूल भारतातच सोडले असे म्हटले आहे.या प्रकरणामुळे सरोगसी प्रकरणाची राष्ट्रीय चौकशी व्हावी, अशी मागणी न्या. ब्रायन्ट यांनी केली आहे. एकाच बाळासह या दाम्पत्याला घरी परत येता यावे यासाठी व्हिसा द्यावा यासाठी आॅस्ट्रेलियाने दबाव आणला होता, असेही दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आॅस्ट्रेलियन दाम्पत्याने दोन बाळापैकी मुलाला नेले की मुलीला हे अद्याप कळलेले नाही. सरोगेट मदर म्हणून काम करणाऱ्या महिलेला दाम्पत्याच्या या निर्णयाचा त्रास झाला. या दाम्पत्याने दोन्ही मुले न्यावीत यासाठी त्यांना आग्रह करावा, त्यांच्याशी वाटाघाटी कराव्यात असे या महिलेने म्हटले होते. पण अखेरीस याचा काहीही उपयोग झाला नाही.आॅस्ट्रेलियाने या दाम्पत्याला एकाच मुलासह येण्यासाठी व्हिसा द्यावा यासाठी दबाव आणला, असे दूतावासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. आॅस्ट्रेलियाच्या परराष्ट्रमंत्री ज्युली बिशप यांनी या प्रकरणाची काहीही माहिती नसल्याचे म्हटले आहे. अशा निर्णयामुळे मुलाचे जीवन धोक्यात येऊ शकते हे त्यांनी मान्य केलेआहे. याआधी थायलंडमध्ये गॅमी नावाचा सरोगेट पद्धतीने जन्मलेला मुलगा जन्मत: डाऊन सिंड्रोम (मंदबुद्धी) असल्याने आॅस्ट्रेलियन दाम्पत्याने नाकारला होता, त्याऐवजी गॅमीच्या दोन बहिणींना घेऊन हे दाम्पत्य परतले होते. (वृत्तसंस्था)
सरोगेट बाळाला भारतातच सोडण्याचा निर्णय
By admin | Published: October 10, 2014 3:25 AM