ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 10 - पाकिस्तानला दहशतावादी राष्ट्र म्हणून घोषित करावे, अशी मागणी अमेरिकेच्या संसदेत करण्यात आली आहे. पाकिस्तानसोबतच्या संबंधांबाबत पुन्हा नव्याने धोरणं निश्चित करण्याची मागणी करत एका खासदाराने संसदेत यासंबंधिचे विधेयक संसदेत सादर केले. संसदेतील दहशतवादसंबंधी उपसमितीचे अध्यक्ष टेड पो यांनी गुरुवारी 'अविश्वसनीय सहकारी' असे शीषर्क असलेले विधेयक सादर केले.
विधेयक सादर करताना टेड पो म्हणाले की, केवळ पाकिस्तानच अविश्वसनीय सहकारी नसून इस्लामाबादनंही अनेक वर्षे अमेरिकेच्या कट्टर शत्रूंची मदत केली आहे. कुख्यात दहशतवादी ओसामा बिन लादेनला आश्रय देण्यापासून ते हक्कानी नेटवर्कसोबतची जवळीक, यावरुन दहशतवादीविरोधातील लढाईत पाकिस्तान कुणाला साथ देणार हे सिद्ध होत आहे. त्यामुळे पाकिस्तान करत असलेल्या विश्वासघाताला सहकार्य देणं थांबवण्याची हिच योग्य वेळ आहे.
या विधेयकानुसार, पाकिस्तानाने आंतरराष्ट्रीय दहशतवादी कारवायांमध्ये सहकार्य दिले आहे का?, याबाबतचा अहवाल 90 दिवसांच्या आत सादर करून संसेदत मांडायचा आहे. यावर, पाकिस्तानबाबत निश्चित भूमिका ठरवण्यासाठी परराष्ट्र मंत्र्यांना 30 दिवसांनंतर पाठपुरावा करणारा अहवाल सादर करायला सांगण्यात येईल. जेणेककरुन 'पाकिस्तान दहशतवाद पुरस्कृत राष्ट्र आहे', हे स्पष्टपणे मांडता येईल.
तसंच, जर पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत राष्ट्र ठरवता आले नाही, तर त्याचे कायद्यानुसार कारण अहवालात स्पष्टपणे मांडवे, असेही विधेयकात नमूद करण्यात आले आहे. दरम्यान, पाकिस्तानला दहशतवाद पुरस्कृत राष्ट्र ठरवण्यासंबंधी अमेरिकेतील संसंदेत यापूर्वी विधेयकं मांडण्यात आली आहेत. यापूर्वी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या कार्यकाळात या विषयावर ऑनलाइन याचिका दाखल करण्यात आली होती, या मोहीमेला मोठ्या प्रमाणात समर्थनही मिळाले होते.