दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक-योल यांनी मंगळवारी विरोधी पक्षांवर सरकार अपंग बनवणे, उत्तर कोरियाप्रति सहानुभूती ठेवणे आणि देशाची संवैधानिक व्यवस्था कमकुवत करण्याचा आरोप करत देशात 'इमरजन्सी मार्शल लॉ'ची घोषणा केली आहे. त्यांनी टेलिव्हीजनवरून देशाला संबोधित करताना ही घोषणा केली. याच बरोबर दक्षिण कोरियातील तणाव आणखी वाढला आहे.
राष्ट्रपती यून सुक-योल आपल्या संबोधनात म्हणाले, 'उत्तर कोरियाच्या कम्युनिस्ट शक्तींकडून निर्माण होणाऱ्या धोक्यांपासून दक्षिण कोरियाचे संरक्षण करण्यासाठी आणि देशविरोधी घटकांना संपवण्यासाठी मी आणीबाणी (इमरजन्सी) मार्शल लॉ जाहीर करत आहे.' देशाच्या स्वतंत्र आणि घटनात्मक व्यवस्थेचे रक्षण करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. पुढील वर्षाच्या अर्थसंकल्पावरून युन यांची पीपल्स पॉवर पार्टी आणि विरोधी डेमोक्रॅटिक पार्टी यांच्यात सुरू असलेल्या वादानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.
मे 2022 मध्ये पदभार स्वीकारल्यापासून विरोधी पक्षाच्या-नियंत्रणाखाली असलेल्या नॅशनल असेंब्लीमध्ये विरोधाचा सामना करणाऱ्या यून यांनी, सुव्यवस्था पुरस्थापित करण्यासाठी आणि दक्षिण कोरियाच्या स्वातंत्र्याचे संरक्षण करण्यासाठी हे पाऊल आवश्यक असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, 'मी शक्य तेवढ्या लवकर देशविरोधी शक्तींचा खात्मा करीन आणि देशात सामान्य स्थिती पूर्ववत करीन.
राष्ट्रपती यून यांनी विरोधकांचा आरोप सत्य सिद्ध केला - गेल्या काही महिन्यांपूर्वी, डेमोक्रॅटिक पक्षाच्या नेतृत्वाखालील विरोधी पक्षाने आरोप केला होता की अध्यक्ष यून हे सत्तेचा गैरवापर केल्याबद्दल, त्यांच्याविरुद्धची महाभियोगाची कारवाई टाळण्यासाठी मार्शल लॉ लागू करण्याचा कट रचत आहेत. मार्शल लॉ देशात हुकूमशाहीला जन्म देऊ शकतो, असे विरोधी पक्षनेते ली जे-म्युंग यांनी म्हटले होते. युन यांनी विरोधकांचे हे आरोप फेटाळून लावले होते. पंतप्रधान हान डुक-सू यांनीही दावे फेटाळून लावले होते आणि दक्षिण कोरियाचे लोक असे पाऊल स्वीकारणार नाहीत, असे म्हटले होते.